5000 कोटींची गुंतवणूक, 4500 नोकऱ्या... तळेगावमध्ये Hyundai उभारणार कारखाना
Hyundai To Invest Rs 5000 Crore In Talegaon Plant: हा प्रकल्प राज्यात यावा यासाठी राज्य सरकारने हलचाली सुरु केल्या असून शिंदे सरकारमधील 2 महत्त्वाच्या मंत्र्यांनी या कंपनीच्या कारखान्याला भेट देऊन प्रकल्पासंदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे. हा करार व्हावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे.
Hyundai To Invest Rs 5000 Crore In Talegaon Plant: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील तळेगाव येथे ह्युंडाई कंपनीचा प्रकल्पा उभारला जाणार आहे. ह्युंडाई मोटर इंडिया कंपनीच्या या प्रकल्पामुळे राज्यात 5 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. पुढील 5 वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार आहे. मात्र या प्रकल्पाच्या कंपनीविरोधात सध्या आंदोलन करणाऱ्या 1 हजार कर्मचाऱ्यांच्या समस्येवरही या प्रकल्पाच्या माध्यमातून समाधान मिळणार आहे. या प्रकल्पासाठी शक्य ती सर्व मदत महाराष्ट्र शासनाकडून पुरवली जाईल अशी ग्वाही शिंदे सरकारने दिली आहे.
त्या हजार कर्चमाऱ्यांची कोर्टात
राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकल्पासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. तळेगावमधील जनरल मोटर्स म्हणजेच जीएम कंपनीचा कारखानाच ह्युंडाई कंपनी ताब्यात घेणार आहे. सध्या जीएम कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा याला विरोध असून यावर सामंजस्याने तोडगा काढण्यासंदर्भात सर्व प्रयत्न सुरु आहेत असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकी कंपनी असलेल्या जीएमने दक्षिण कोरीयन ह्युंडाई कंपनीबरोबर तळेगाव येथील कारखाना आणि त्यामधील सर्व सामृग्री विकण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्याची तयारी दर्शवली आहे. या कराराविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जीएम कंपनीमध्ये काम करणाऱ्या 1 हजार कर्मचाऱ्यांनी याचिका दाखल केली असून ही याचिका स्वीकारण्यात आली आहे.
याचिका हायकोर्टाने स्वीकारली
पुण्यातील इंडस्ट्रीयल कोर्टाने ह्युंडाई कंपनी आणि जीएम कंपनीमधील करारावर स्थगिती देण्यास नकार देणाऱ्या निर्णयाला जीएम कंपनीमधील कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन आव्हान दिलं आहे. ही याचिका स्वीकारल्याची माहिती जीएम कंपनीमधील कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधिंनी 'ऑटोकार प्रोफेश्नल'ला दिली आहे. उच्च न्यायालय या खरेदी विक्री कराराला स्थगिती देण्याचा निर्णय घेऊ शकते असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.
राज्यातील मंत्री काय म्हणाले?
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ह्युंडाईच्या गोयांग स्टुडीओ येथील कारखान्याला राज्याचे औद्योगिक सचिव डॉ, हर्शदीप कांबळे आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्याबरोबर जाऊन भेट दिली होती. जीएम आणि ह्युंडाई कंपन्यांमध्ये हा खरेदी-विक्रीचा करार व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असून हा करार झाला तर ह्युंडाई कंपनी याच कारखान्यामध्ये वाहननिर्मितीला सुरुवात करेल. "ह्युंडाई कंपनीच्या या कारखान्यामुळे 4500 जणांना रोजगार मिळणार आहे," असं सांमत यांनी सांगितलं. तर कामगार मंत्री खाडे यांनी आपलं मंत्रालय ह्युंडाई व्यवस्थापनाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. जीएम कंपनीच्या आताच्या कर्मचाऱ्यांना नव्या कारखान्यामध्ये सामावून घेतलं जाईल असंही खाडे म्हणाले. "आम्ही ह्युंडाई कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर सविस्तर चर्चा केली आहे. ह्युंडाई कंपनी जीएम कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावेल अशी अपेक्षा आहे. लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा आहे," असं खाडे म्हणाले.
4000 कोटींची गुंतवणूक 2028 पर्यंत
5000 कोटींच्या गुंतवणुकीपैकी 4000 कोटींची गुंतवणूक 2028 पर्यंत केली जाईल अशी माहितीही सामंत यांनी दिली आहे.