हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पार्थ पवार चर्चेत आलेत. पार्थ पवार यांचे गाडी चालक मनोज ज्योतीराम सातपुते यांना मारहाण करण्यात आलीय... अगोदर अतिशय फिल्मी स्टाईलनं 'मारुती ओमिनी' गाडीतून सातपुते यांचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना पुणे-नगर महामार्गावरील मोकळ्या माळरानावर बेशुद्धावस्थेत फेकून देण्यात आलं. ही धक्कादायक घटना ५ जुलैच्या रात्री घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मनोज सातपुते ५ जुलै रोजी रात्री ८ च्या दरम्यान मुंबईमधील कुलाबा बस स्थानक येथून खासगी काम पूर्ण करून आमदार निवासाकडे जात होते. तेव्हा अचानक समोर आलेल्या ओमिनी गाडी चालकाने त्यांच्याकडे 'तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का?' असा प्रश्न विचारला. 'आम्हाला पार्थ यांना भेटायचे आहे. त्यांचा पत्ता आम्हाला सापडत नाही... त्यांना काही वस्तू द्यायची असल्याची' बतावणी या व्यक्तीनं सातपुते यांच्याकडे केली... आणि मनोज सातपुते यांना गाडीत घेत समोरच्या सीटवर बसवले. 


यावेळी, गाडीच्या मागच्या सीटवर अगोदरपासूनच एक व्यक्ती असल्याचं सातपुते यांच्या लक्षात आलं. त्यानंतर काय घडलं हे सातपुते यांच्या दुसऱ्या दिवशीच लक्षात आलं. त्यांना शुद्ध आली तेव्हा ते पुणे-नगर महामार्गावर रस्त्याच्या कडेला पडले होते... ही माहिती मनोज सातपुते यांनी आपल्या जबाबात दिली आहे. 


पार्थ पवारांचे ड्रायव्हर मनोज सातपुते हे मुळचे सणसवाडी येथील रहिवासी आहेत. शुद्धीत आल्यानंतर सुपा येथील घटनास्थळावरुन त्यांनी एसटी बसने सणसवाडी येथील खासगी रुग्णालय गाठलं. त्यानंतर कुटुंबीयांशी संपर्क साधत आई-वडिलांसह त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञातांवर अपहरण आणि मारहाणीचे गुन्हे दाखल केले आहेत. 


पुढील तपास कुलाबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांच्या चालकाला मारहाण करुन अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. परंतु, सातपुते यांचं अपहरण नेमकं का करण्यात आलं? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधित तपास करत आहेत.