चैत्राली राजापूरकर, पुणे : संत तुकाराम महाराजांच्या पादुका उद्या पंढरपूर कडे रवाना होणार आहेत. यासाठी देहूमध्ये आजपासून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. तर देहू मध्ये नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. देहूच्या मुख्य मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. उद्या देखील देहूमध्ये कशाप्रकारे संपूर्ण बंदोबस्त असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देहूनगरीत 5 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या एकही व्यक्तीला देहूनगरीत आजपासून प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तर मंदिरात देखील काही मोजक्याच लोकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पादुका मुख्य मंदिरात केवळ आजचा एकच दिवस असणार आहेत. त्यामुळे अनेक भाविक आज देहू मध्ये दर्शनासाठी येत आहेत. 


पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूनगरीत आजपासून जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. तर 2 पोलीस निरीक्षक, 5 एपीआय, 5 पीएसआय, 50 महिला आणि पुरुष कर्मचारी, 2 एसआरपीएफ प्लाटून असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


उद्या सकाळी 8 वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी पंढरपूर कडे रवाना होणार आहे. पहाटे 4 वाजता काकडा, 5 वाजता मुख्य मंदिरातील विठ्ठल रुख्मिनी मंदिरात अभिषेक, पालखी सोहळ्याचे जनक तसेच संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांचा अभिषेक, शिळा मंदिर येथे अभिषेक होणार असून त्यानंतर 'रामकृष्ण हरी पालखी प्रदक्षिणा भजन' होऊन मुख्य मंदिरातून पालखी प्रदक्षिणा करून देहू मधील इनामदार वाड्यात जाईल. त्यानंतर इनामदार वाड्यात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची आरती होऊन पालखी पंढरपूर कडे रवाना होईल.