औषधं नीट घेत चला; शरद पोंक्षेंना `या` व्यक्तीचा बोचरा सल्ला
अस्पृश्यता निवारणाच्या मुद्यावरुन छेडला गेला विषय
पुणे : रंगमंच आणि सबंध कलाविश्वात आपल्या अभिनयाच्या बळावर प्रसिद्धीझोतात आलेले शरद पोंक्षे हे त्यांच्या ठाम विचारांसाठीही ओळखले जातात. विविध कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत व्यापक मुद्दयांवर आपल्या प्रतिक्रिया देणाऱ्या शरद पोंक्षे यांनी पुण्यात पार पडलेल्या एका कार्यक्रमात सावरकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक वक्तव्य केलं. अस्पृश्यता निवारणाविषयीच्या त्यांच्या याच वक्तव्यावर आता सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. काहींनी तर, त्यांना वेळेवर औषधं घेण्याचाही सल्ला दिला आहे.
'अस्पृश्यता निवारणामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान मोठं आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यापेक्षाही सावरकरांचं योगदान हे मोठं आहे', असं वक्तव्य पोंक्षे यांनी केलं होतं. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या 'मी सावरकर' या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासमयी ते बोलत होते. त्यांच्या याच वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी असणाऱ्या अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तोफ डागली.
'पोंक्षे, म. फुलेंनी तुमच्या अनेक पिढ्यांचा उद्धार केलाय. फुले आणि बाबासाहेबांचा द्वेष करणारी तुमची हलकट प्रवृत्ती जाता जात नाही. आजारपणामुळे डोक्यावर परिणाम झाल्याचे जाणवते आहे. औषध वेळेवर घेत चला. वेळेवर दवापाणी नसलं की मेंदूवर परिणाम होतो', असं ट्विट त्यांनी केलं. मिटकरी यांच्या ट्विटवर बरीच चर्चाही झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले त्या-त्या जातीत जन्माला आल्यामुळे त्यांना अपमानाचा चटका बसला आणि विद्रोह करत त्यांनी याविरोधात लढा दिला. पण, अस्पृश्यतेचा कोणताही चटका बसलेला नसतानाही सावरकर ब्राह्मणांविरोधात उभे राहतात, असं म्हणत आंबेडकर आणि महात्मा फुले या दोन्ही महापुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ असल्याचं वक्तव्य पोंक्षेंनी केलं होतं.