सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ।
कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
विठ्ठलभक्तीत दंग झालेल्या संतांच्या अभंगवाणीने या जगाला भक्तीमार्ग, परमार्थ आणि प्रपंच कसा कारावा?  याचं सार सांगितलं. आषाढी वारीची महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे.टाळृ-मृदुंगाच्या तालासुरात हजारो किलोमीटरचं अंतर पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा वारसा या भूमीला लाभला आहे. वारककऱ्यांचा हाच सावळा विठ्ठल पंढरपुरात कसा अवतरला, याची दंतकथा देखील तितकीच रंजक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संत ज्ञानेश्वर महाराजां'पासून ते ;संत जनाबाई' आणि 'संत तुकोबारायां'नी अभंगवाणीतून साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडवून आणलं. हाच विठ्ठल पंढरपुरात कसा अवतरला हे जाणून घेऊयात. असं सांगितलं जातं की, रुक्मिणीशी लग्न झाल्यानंतरही राधा, श्रीकृष्णाच्या मनातून जात नव्हती. हे पाहून रुक्मिणीला वाईट वाटलं. तेव्हा कोणालाही न सांगता ती निघून गेली. रुक्मिणीला शोधत कृष्ण महाराष्ट्रातील 'दिंडीरवना'त दाखल झाला. रागावलेल्या रुक्मिणीची समजूत काढण्यात कृष्ण यशस्वी झाला. म्हणूनच दिंडीरवनाजवळील पंढरपुरातील 'गोपाळपूर वाडी'ला वारकरी मनोभावे श्रद्धेने येतात. अशी आख्यायिका सांगितली जाते. 



'भक्त पुंडलिक' हा माता पितांची सेवा करत असे, त्याच्या आईवडिलांची सेवा करण्यात तो धन्य होत असे. पुंडलिक हा दिंडोरवनात आई वडिलांसेबत राहत होता. त्याच्या या सेवेला प्रसन्न होत साक्षात 'भगवान विष्णू' त्याच्या भेटीस आले होते. मात्र आई वडिलांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने भगवान विष्णूंना भेटण्यास नकार दिला. भगवान विष्णू बराच वेळ पुंडलिकाच्या दारात उभे होते. त्यांना त्रास होईल हे लक्षात घेत पुंडलिकाने विष्णूंना उभे राहण्यासाठी वीट दिली. आई वडिलांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाच्या मातृ पितृ प्रेमावर विष्णूदेव प्रसन्न झाले. त्यानंतर युगे अठ्ठावीस विटेवरी उभा असा हा पांडुरंग पंढरपुरात अवतरला अशी देखील आख्यायिका सांगितली जाते. 



करवीर निवासिनी आई अंबाबाई, श्री खंडोबा, कोल्हापूरचा ज्योतिबा, तुळजापूरची आई भवानी याप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून विठ्ठलाच्या पंढरपुरीला भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात. हातात कोणतेही शस्त्र धारण न केलेल्या सावळ्या विठ्ठलाने संताजनांना त्याच्या असण्याचे वेड लावले. महाराष्ट्राप्रमाणेच, दक्षिण भारतीय आणि जैन समाजातील अनेक कुटुंबाचं 'विठुराया' आराध्य दैवत आहे.