गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी; नामस्मरणाचे महत्त्व सांगणारे महाराज
Bramha Chaitanya Gondavalekar Maharaj Punyatithi : ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची पुण्यतिथी 6 जानेवारी 2024 रोजी आहे. आजही त्यांनी सांगितलेले नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले आहे.
Gondavalekar Maharaj Punyatithi: ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील गोंदवले या गावी झाला. महाराष्ट्रात गोंदवलेकर महाराजांची एक संत, सत्पुरुष अशी ख्याती आहे. श्री गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. गोंदवलेकर महाराजांच्या पश्चात इतक्या वर्षांनीही त्यांनी सुरु करुन दिलेल्या सेवेच आजतागायत कधीच खंड पडलेला नाही. महाराजांचे कार्य एवढे मोठे झाले की त्यांच्या पश्चातही आज जगभरात खूप अनुयायी गुरु उपदेशाचे पालन करत आहेत.
गोंदवलेकर महाराजांचा मूळ नाव
गोंदवलेकर महाराजांचे मूळ नाव गणपती रावजी घुगरदरे. लहानपणापासूनच श्रीरामपरायण केल्यामुळे सद्गुरुंची ओढ त्यांना लागली व गुरूंचा शोध घेण्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी घराबाहेर पडले. या प्रवासात ते अनेकांना भेटले, अनेक ठिकाणी फिरले. या काळात श्रीमहाराजांनी योगविद्या हस्तगत केली. मात्र, मनाचे समाधान होईना. श्रीसमर्थांच्या परंपरेतील रामकृष्णांच्या सांगण्यानुसार नाथपंथीय गुरूपरंपरेतील येहळेगाव येथील तुकामाईंकडे गेले. तुकामाई म्हणजे योग आणि भक्ती यांचा अपूर्व संगम होता. तुकामाईंनी त्यांचे ‘ब्रह्मचैतन्य’ असे सांप्रदायिक नाव ठेवले. ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा त्रयोदशाक्षरी (तेरा अक्षरांचा) मंत्र जपून रामोपासना करण्यास सांगितले आणि त्यांनी श्रीमहाराजांना रामदासी दीक्षा दिली. आपल्या गुरूंच्या रामनामोपासनेची साधना त्यांनी अंत:कालापर्यंत केली आणि रामनामोपासना सुलभ परमेश्वरप्राप्तीचा उपाय म्हणून सर्वसामान्यांना उपदेश करण्यात आयुष्य वेचले.
महाराजांचे विचार
श्रीमहाराजांनी तत्त्वज्ञान शास्त्रीय परिभाषेत न सांगता सामान्यांना समजेल अशा सुलभ, व्यवहारिक भाषेत सांगितले. माणसाने आपल्या जीवनात परमेश्वराचे स्मरण करून प्रपंच आनंदमय परमार्थस्वरूप करावा, असे ते सांगत. परमात्मा सर्वव्यापी आहे. मर्म जाणण्याचा उपाय श्रीमहाराजांनी सांगितला. जपाने हे अनुसंधान साध्य होते. म्हणून भगवंताचे नाम हे साधन आहे. ते मीपणा नाहीसा करते, असे ते सांगत. श्रीमहाराजांनी गृहस्थाश्रम स्वीकारल्यामुळे त्यांना आध्यात्मिक कार्य, नामोपदेश करणे सुलभ झाले. त्यांनी सर्व स्तरांतील लोकांना प्रवचनांनी समाधान दिले. दु:खातून मुक्त होण्याचा मार्ग सांगितला. तो मार्ग आचरणात आणावा, यासाठी त्यांनी अन्नदान, वस्त्रे, निवारा यांची सोयही केली.
ब्रम्हचैतन्य हे नाव कुणी दिले
तुकाराम चैतन्यांनी त्यांचे 'ब्रह्मचैतन्य' असे नांव ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गोंदवलेकरांनी हजारों लोकांना रामभक्तीला लावले. त्यांचे शिष्य मध्यमवर्गीय असून महाराष्ट्र व कर्नाटकचे असून जास्त करून उत्तरभारतीय आहे. त्यांची प्रथम पत्नी वारल्यावर त्यांनी जन्मांध मुलीशी लग्न केले. त्यांनी आपल्या घरात रामाचे देऊळ उभारले. तसेच अनेक ठिकाणीपण रामाचे देऊळ उभारून उपासनकेंद्रांची स्थापना केली. त्यांनी व्यक्तिगत उपदेश, प्रवचन, भजन, कीर्तन या माध्यमाने कौटुंबिक कलह मिटवून अनेकांचे संसार सुखी केले. तसेच अनेक लोकांना व्यसने, दुराचरण, दुराभिमान, सांसारिक काळजी ह्या पासून मुक्त केले. त्यांचा लोकसंग्रह खूप मोठा होता.