Central Railway : कधी ओव्हरहेड वायर तुटली, कधी रेल्वेचा डबा घसरला, तर कधी तांत्रिक बिघाड झाला अशी कारण देत मध्य रेल्वे दररोज 15 ते 30 मिनिटं उशीराने धावतेय. पावसाळ्यात तर रेल्वे प्रवशांच्या सहनशक्तीचा अंतच मध्य रेल्वे प्रशासन पाहात असते. मध्य रेल्वे आणि उशीर हे आता जणू एक समीकरणच झालं आहे. विशेषत: सकाळी कामावर जाताना आणि संध्याकाळी कामावरुन परतताना मध्य रेल्वेला उशीरा रेल्वे चालवण्याचा मुहूर्त मिळतो. त्यामुळे कामावर जाणाऱ्या आणि कामावरुन येणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होतात. यात कॉलेजचे विद्यार्थीही भरडले जात असतात. डोंबिवली, कल्याण, बदलापूर आणि त्यापुढे राहाणाऱ्या प्रवाशांचे हाल तर त्याहून भयानक असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवासी संघटना आक्रमक
मध्य रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे रेल्वे प्रवासी संघटना आता आक्रमक झाल्या असून आंदोलनाच्या तयारीत आहेत. शनिवाारी म्हणजे 10 ऑगस्टला संध्याकाळी ठाणे जिल्ह्यात आंदोलनासंदर्भात बैठक होणार असून, या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. कार्यालयीन वेळेत रेल्वे सेवा दररोज धीम्या गतीने धावते त्यामुळे प्रवशांना दररोज समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोज मुंबईकर रेल्वेने जीवघेणा प्रवास करत असल्याने प्रवासी संघटना आक्रमक झाल्यात. 22 ऑगस्टला सर्व रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. 


रेल्वे प्रवासी संघटनांचा आरोप
रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी मुंबई लोकल रेल्वे प्रश्नांचा बळी देत आहे. मेल आणि एक्स्प्रेस मुळे रोजच उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेन मुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. 
कळवा ऐरोली लिंक आणि 5 -6 मार्गिका सारखे महत्वाचे प्रकल्प वर्षानुवर्षे MRVC कडून रखडलेले आहेत . कुर्ला ठाणे कल्याण 5-6 मार्गिका तयार असूनही लोकलच्या मर्गिकेवर रात्रं दिवस मेल चालवल्या जात आहेत. 


यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रवाशांना आवाहन केलं आहे. 22 ऑगस्टला सफेद कपडे घालून काळी पट्टी लावून रेल्वेने प्रवास करावा आणि आपला पाठींबा दर्शवावा असं आवाहन करण्यात आलं आहे. आंदोलनानंतर सुद्धा रेल्वे प्रशासन जागे झाले नाही तर टप्या टप्याने आंदोलन तीव्र होत जाईल असा इशाराही रेल्वे प्रशासनाने दिला आहे. 


कल्याण – आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण – बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, हार्बर मार्गाचे विस्तारीकरण, सीएसएमटी – कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, विरार – डहाणू चौपदरीकरण, कळवा – एरोली उन्नत मार्ग असे अनेक प्रकल्प बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहेत. रखडलेल्या प्रकल्पामुळे नवीन लोकल सेवा सुरू करणे आणि लोकलचा वक्तशीरपणा वाढवण्यावर बंधने येतात. रेल्वे प्रशासनाच्या धीम्या कारभारामुळे प्रवाशांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागतो. प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. त्यामुळे आता निषेध आंदोलन सुरू केले जाणार आहे, असे मुंबई रेल प्रवासी संघटनेकडून सांगण्यात आले.


रेल्वे प्रशासन फक्त लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्याना प्राधान्य देत असून, मुंबईकरांच्या लोकलबाबत काहीही देणे घेणे नाही. गेल्या काही महिन्यांपासून लोकलचा वक्तशीरपणा बिघडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमुळे लोकलला विलंब होतो, असे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. लोकलमध्ये गर्दी होऊन प्रवाशांचा मृत्यू होतो. मुंबईकरांचा बळी घेणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे.