Chandra Gochar 3 Yog: ज्योतिषशास्त्रात चंद्र हा सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह आहे. चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदल करत असतो. त्यामुळे या ग्रहाचा प्रत्येक राशीवर त्या त्या गोचरानुसार परिणाम होत असतो. हा परिणाम अल्प कालावधीसाठी असला तरी महत्त्वाच्या कामात ऐन मोक्याच्या वेळी अडचणीचा ठरू शकतो. कधी कधी एकाच राशीत दोन ग्रह एकत्र आल्याने विचित्र योग तयार होतात. काही योग शुभ तर काही योग अशुभ असतात. त्याप्रमाणे गोचराचे परिणाम होत असतात. वैदिक ज्योतिषात चंद्राला मनाचा कारक मानला जातो. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामात अनेक अडचणी येतात. चंद्राच्या राशी बदलाचा बारा राशींवर परिणाम होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 2 वाजून 23 मिनिटांनी चंद्र ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मीन राशीत गजकेसरी योग तयार होणार आहे. मीन राशीत या आधीच वर्षभरासाठी गुरु ग्रहानं आगमन केलं आहे. मीन ही गुरु ग्रहाची स्वरास आहे. त्यामुळे गुरु ग्रह स्वत:च्या राशीत आहे. तर चंद्र गोचर करत या राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे या राशीत गजकेसरी योग तयार होत आहे. 


गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग मानला जातो आणि कुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे. धनाचा कारक बृहस्पति आणि मनाचा कारक चंद्र यामुळे हा योग तयार होतो. हा योग कुंभ राशीच्या दुसऱ्या , मिथुन राशीच्या दहाव्या आणि वृषभ राशीच्या अकराव्या स्थानात तयार होत आहे. त्यामुळे या तीन राशींना चांगला फायदा होईल.


चंद्र 13 सप्टेंबर 2022 रोजी सकाली 6 वाजून 35 मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मेष राशीत ग्रहण योग तयार होणार आहे.  मेष राशीत राहु ग्रह दीड वर्षांसाठी ठाण मांडून आहे. जेव्हा चंद्र राहूच्या संयोगात येतो, तेव्हा ग्रहण योग तयार होतो, हा अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या लोकांवर त्याचे वर्चस्व असते त्यांच्या मानसिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि चंद्राच्या संबंधामुळे चंद्र दूषित होतो. यामुळे मीन, कर्क आणि मिथुन राशीवर परिणाम होईल.


15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान चंद्र मंगळ ग्रहाची वृषभ राशीत युती होत असल्याने लक्ष्मी योग तयार होत आहे. गोचर कुंडलीतील चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होतो. या योगाला धन योग म्हणून संबोधलं जातं. मेष, सिंह आणि कर्क राशीला फायदा होईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)