मुंबई : दिवाळी पाच दिवसांचा उत्सव असतो. या पाच दिवसाच्या उत्सवाची सुरूवात धनत्रयोदशीपासून होते. यावेळी धनत्रयोदशी ही मंगळवारी १७ ऑक्टोबरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी ७.२० ते ८.१७ वाजे दरम्यान असेल. या मुहूर्तावर पूजा केल्यास धन, स्वास्थ्य आणि आयुष्य वाढते असा समज आहे. धनत्रयोदशी हा सुख, धन आणि समृद्धीचा सण मानला जातो. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. ‘धन्वंतरी’ आरोग्य शास्त्राची देवता आहे. त्यामुळे त्यांच्याकडे धनत्रयोदशीच्या दिवशी चांगल्या आरोग्यासाठीही प्रार्थना केली जाते. 


देवता आणि राक्षसांमध्ये समुद्र मंथन


पुराणांनुसार जेव्हा देवता आणि राक्षसांमध्ये समुद्र मंथन झाले तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले होते. ज्यातील एक रत्न अमृत होतं.  भगवान विष्णु हे देवतांना अमर करण्यासाठी ‘धन्वंतरी’च्या रूपात प्रकट होऊन कलशात अमृत घेऊन निघाले होते. त्यामुळेच धन्वंतरीची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते, असे मानले जाते. 


चांदी खरेदी करणे शुभ


धनत्रयोदशीच्या दिवशी लोक घरातील भांडी खरेदी करतात. तसे या दिवशी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. कारण चांदीला चंद्राचे प्रतिक मानले जाते. आणि चंद्र हा शीतलतेचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे चांदी खरेदी केल्याने मनात समाधान राहतं. ज्यांच्याकडे समाधान आनंद आहे, ते स्वास्थ्य, सुखी आणि धनवान राहतात.