Why Is Re 1 Coin Added To The Wedding Shagun: सध्या विवाह मुहूर्तांमुळे लग्न सोहळ्यांची रेलचेल पाहायला मिळेल. लग्न म्हटल्यानंतर आहेर आलाच. बरं आहेरला पटकन् काही सुचलं नाही तर हमखास पाकीट दिलं जातं. पैसे दिले म्हणजे त्यांचं त्यांना काय ते ठरवता येईल, अशी सबबही जोडली जाते. मात्र आहेर देताना कायमच 101 रुपये किंवा 1001 रुपये किंवा 5001 किंवा अशाच पद्धतीने वर एक रुपया येईल अशा मूल्यात दिला जातो. यामागील कारण तुम्हाला ठाऊक आहे का? याचसंदर्भात जाणून घेऊयात...


101 किंवा 1001 असाच आहेर किंवा देणगी का देतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर भारतीय संस्कृतीमध्ये नाण्यांना फार महत्त्व आहे. मुघल काळात तर भारतात सोन्याची आणि चांदीची नाणीही चलनात होती. मात्र सध्या कॉपर हा नाणी बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य धातून आहे. अर्थात नाण्यांचा आकार आणि वापर कालानुरुप बदलत गेला आहे. मात्र या नाण्यांचं महत्त्व कधीच कमी झालं नाही. याचाच संदर्भ आपल्याला शुभ कार्यामध्ये देणगी देताना किंवा अगदी आहेर देतानाही सापडतो. आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी देणगी देताना 101 किंवा 1001 किंवा अशाच प्रकारचे वर एक रुपया देणाऱ्या रक्कमेतच देणगीही दिली असणार. हाच प्रकार आहेर करतानाही दिसून येतो. मात्र या वरच्या एक रुपयाला एवढं महत्त्व का आहे माहितीये का?


सगळ्यात आधी नाण्यांचा वापर कधी आणि कुठे झाला?


मानवाने नाण्यांचा पहिल्यांदा वापर कधी केला याबद्दलचा संदर्भ 4000 वर्षांपूर्वी सापडतो. मिसेपोटेमियामधील बॅबलिऑन संस्कृतीमध्ये पहिल्यांदा नाणी वापरली गेली. वेगवेगळ्या धातूंपासून ही नाणी बनवलेली होती. मात्र सर्वात जास्त प्रमाणात आणि अगदी सर्व सामान्यांनी वापरलेलं पहिलं नाणं हे तुर्कीमधील किंग कॉर्सेस ऑफ लायडियाने जारी केलं होतं. जगातील सर्वात जुनं नाणं हे लायडिया लायन हेच आहे. हे गाणं 4.7 ग्रामचं असून ते सोनं आणि चांदीपासून बनवण्यात आलं होतं. त्यावर सिंहाचा चेहरा असल्याने त्यावरुनच त्याचं नाव पडलं.


भारतीय नाण्यांचा इतिहास अन् भारतीय नाण्याला 'रुपया' नाव कोणी दिलं?


भारताबद्दल बोलायचं झालं तर मौर्यांच्या राजवटीच्याआधीपासूनच धातूची नाणी आपल्या देशात तयार होत होती असं दिसून येतं. हडप्पा संस्कृतीमध्येही नाण्यांचा संदर्भ सापडतो. भारतातील पहिलं नाणं 'पाना' नावाने ओळखलं जातं. हे नाणं उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जवळील बराह नगर येथील उत्खननात सापडलं होतं. त्यावर एका बाजूला हत्ती तर दुसऱ्या बाजूला वाघाचा चेहरा रेखाटला आहे. भारतामध्ये पूर्वी चांदीच्या नाण्याला 'रुपका' असं म्हटलं जायचं. तर सोन्याच्या नाण्यांना 'दिनार' असं म्हणत. 1545 मध्ये शेर शाह सुरीने भारतीय चलनासाठी आजही वापरलं जात ते 'रुपया' हे नाव दिलं. तेव्हापासूनच भारतीय चलनाला रुपया हे नाव प्रचलित झालं. पूर्वी राजे त्यांच्या इच्छेप्रमाणे नाणी बनवून घ्यायचे. अनेक नाण्यांवर तर राजांच्या प्रतिमा किंवा प्राणी आणि पक्षांच्या प्रतिमा आढळून यायच्या.


भारतात कुठे तयार होतात नाणी?


भारतात सध्या मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडामधील टांगसाळांमध्ये नाणी तयार केली जातात. आजही नाण्यांना धार्मिक कार्यात फार महत्त्व आहे. पूजा असो किंवा आहेर, देणगी असो नाण्यांचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही. आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊयात की आहेर, देणगी देताना वर एक रुपया का दिला जातो. हल्ली तर आहेरांच्या पाकिटांवरच एक रुपया चिकटवलेला असतो. पण या एका रुपयाचं महत्त्व एवढं का आहे? 


...म्हणून आहेर, देणगी देताना वर 1 रुपया देतात


तर असं मानलं जातं की एका रुपयाच्या नाण्यामध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो. त्यामुळेच शंभरच्या पटीत म्हणजेच 100 किंवा 1000 किंवा अगदी 1 लाख रुपये दिले तरी त्यावर एक रुपया आवर्जून दिला जातो. यामुळे दिलेल्या देणगीच्या रक्कमेला कशानेही भाग जात नाही म्हणजेच दिलेली रक्कम वाटली जात नाही आणि ती अधिक शक्तीशाली होते असं मानलं जातं. तसेच दुसरे कारण म्हणजे शून्य हा आकडा शुभ समजला जात नाही. त्यामुळेच दिलेल्या रक्कमेमध्ये एक रुपया आवर्जून दिला जातो त्यामुळे रक्कमेचं मूल्य हे शून्य या आकड्याने संपत नाही. 1 ही नवी सुरुवात मानली जाते. म्हणूनच 100 रुपये देण्याऐवजी चांगल्या कार्यासाठी 101 रुपये आणि त्या पटीतच पैसे दिले जातात. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)