दिवाळीनिमित्त `मायबोली` ची साहित्य मेजवानी
दिवाळीच्या औचित्याने `मायबोली` हे युट्यूब चॅनल रसिकांसाठी अनोखी `साहित्य मेजवानी` घेऊन आले आहे.
मुंबई : दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास, फराळ, आनंद, उत्साह असं सगळंच. या निमित्ताने विशेषत: मुंबई-पुण्यात होत असलेल्या 'दिवाळी पहाट' च्या कार्यक्रमांनाही रसिक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. दिवाळीच्या औचित्याने 'मायबोली' हे युट्यूब चॅनल रसिकांसाठी अनोखी 'साहित्य मेजवानी' घेऊन आले आहे.
कधी गडद अंधार तर कधी लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारा दिवाळीचा सण. यांना आपलंसं कसं करायचं याची प्रचिती 'मायबोली साहित्यफराळाच्या' व्हिडिओतून आपल्याला येणार आहे. 'मायबोली' चे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या पसंतीस पडत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन परब यांनी कवी लोकनाथ यशवंत यांच्या 'भीमराव मेश्रामची कविता' चे आपल्या खास शैलीत वाचन केले आहे.
'मायबोली' या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सध्या मराठी साहित्यविषय एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून #मराठीसाहित्य असा ट्रेंड सुरु करण्याचा 'मायबोली' चा प्रयत्न असून त्यांनी सुरू केलेल्या या चळवळीत सर्व साहित्य रसिकांना सहभागी होता येणार आहे.
यासाठी आपल्याला आवडलेला साहित्यप्रकार 'मायबोली'च्या entertainmentsaad@gmail.com या ईमेल वर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या साहित्यप्रकाराला व्हिडिओ स्वरुपात आणण्याचं काम हे यू ट्यूब चॅनेल करणार आहे.