Diwali 2024 Date in Maharashtra :  हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आणि सण म्हणजे दिवाळी...प्रकाशाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसपासून दिवाळीला सुरुवात होते. मग नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिली आंघोळ केली जाते. या सणाला छोटी दिवाळी असंही म्हणतात. यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काही लोक म्हणतात दिवाळी 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला आहे. यामागे सर्व घोळ हा दोन दिवस प्रदोष काळात अमावस्या तिथी आल्यामुळे झाला आहे. अशात महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कधी करायचं याबद्दलचा गोंधळ पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी दूर केलाय. 


दिवाळी कधी आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्विनी महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. पंचांगानुसार अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे. त्यासोबत प्रदोष काळ आणि वृषभ काळ हे दोन शुभ काळ दिवाळीत पूजेसाठी महत्वाचे आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार प्रदोष आणि वृषभ काळात दिवाळी पूजा किंवा लक्ष्मी पूजा करणे खूप शुभ मानले जाते. 


दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुसऱ्या दिवशी प्रदोषकालात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिलं आहे. काही ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात जर तुम्हाला अमावस्या तिथीमध्येच शुक्रवार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर 5 वाजून 53 मिनिटापर्यंतच करावं लागणार आहे. 


1962, 1963 आणि 2013 मध्येही दोन दिवस प्रदोषकालात आश्विन अमावास्या आली होती. त्यावेळीही दुसऱ्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केलं होतं असं पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितलंय.


लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त अमावस्या काळात -  संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत


प्रदोष काळात लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त - संध्याकाळी 5:35 ते रात्री 08.06 पर्यंत 


भारतात कुठल्या शहरात कधी दिवाळी ?


खरं तर उत्तर भारतीय 31 ऑक्टोबर तर महाराष्ट्रातील मराठी लोक 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत. दिल्ली आणि मुंबईत 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. उत्तराखंडमध्ये 1 नोव्हेंबरला, हरियाणा, बिहार आणि उत्तर भारतात 31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे. 



लक्ष्मीपूजन साहित्य (Lakshmi Pujan Sahitya) 


लक्ष्मीपूजनकरिता काय साहित्य लागतं याविषयी आपण जाणून घेऊयात 


लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती
गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती
कुबेराचा फोटो किंवा मूर्ती
नाणी किंवा नोटा
दागिने किंवा चांदीची नाणी
एक कोरीवही घ्यावी त्यावर कुंकवाने ओम काढावा किंवा स्वस्तिक काढावा. 
चौरंग किंवा पाठ 
लाल रंगाचे कापड 
पाणी
तांदूळ 
गंध 
पंचामृत
हळद, कुंकू 
अक्षदा 
फुले 
विड्याची पाच पाने 
झाडू
लाह्या बताशे


लक्ष्मी पूजन का केलं जातं ? (Lakshmi Pujan story)


प्रत्येक सणामागे एक पौराणिक कथा आहे. लक्ष्मीपूजनाबाबत पण एक प्रसिद्ध कथा आहे. असं म्हणतात विष्णू देवाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व देवांना माता लक्ष्मीसह बळीच्या कारागृहातून मुक्त केलं होतं. माता लक्ष्मी ही भगवान विष्णू यांची पत्नी, त्यामुळे आपण आजच्या दिवशी आपण लक्ष्मी मातेची पूजा करतो आणि विजयाचा आनंद साजरा करतो. 


लक्ष्मीपूजन विधी (Lakshmi Pujan ritual)


लक्ष्मीपूजन विधी करण्याकरिता सर्वप्रथम देवघरामध्ये एक चौरंग ठेवावा त्यावर लाल कापड अंथरून घ्यावा. त्यावर उजव्या बाजूला कळस मांडावा त्या कळसांमध्ये पाच विड्याची पाने टाकावी, एक रुपयाची नाणी टाकावे आणि कळसाच्या वर नारळ ठेवावा त्या नारळाची शेंडी वर असली पाहिजे. आपण जो चौरंग घेतला आहे, त्या चौरंग वर मध्यभागी तांदुळाची रास करावी.  त्यावर गणपती, कुबेर, लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. जर तुमच्याकडे काहीच नसेल तर सुपारी ठेऊ शकतात. त्यानंतर चौरंगावर जागा शिल्लक असेल त्या जागेमध्ये हिशोबाची वही आणि पेन ठेवावी तसंच पैसे नाणी ठेवावे. त्यानंतर चौरंगाची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यावी. फराळ आणि लाह्या बताशे यांचा नैवेद्य दाखवावा. झाडूला लक्ष्मी मानतात म्हणून नवीन झाडूची पूजा केली जाते. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)