Lalita Panchami 2022: ललिता पंचमीचे व्रत केल्यास मिळते आरोग्याचे वरदान, साजरा कसा करायचा ते जाणून घ्या!
Lalita Panchami 2022: ललिता पंचमीच्या दिवशी माता सतीचे स्वरूप असलेल्या ललिता देवीची पूजा केली जाते. या दिवशी विधिवत पूजा केल्याने देवीच्या आशीर्वादाने व्यक्तीची सर्व दुःख आणि वेदनांपासून मुक्ती होते. तसेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
Lalita Panchami 2022 : हिंदू धर्मीय शारदीय नवरात्र (Shardiya Navratri) मोठ्या प्रमाणात आणि सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरी करतात. 26 सप्टेंबर पासून सुरू झालेला नवरात्रीची सांगता 5 ऑक्टोबरला दसरा सण साजरा करून केली जाणार आहे. मग या नवरात्रीमध्ये यंदा ललिता पंचमी (Lalita Panchami), अष्टमी (Ashtami) कधी आहे हे देखील जाणून घ्या आणि चैतन्यमय अशा नवरात्रीसाठी सज्ज व्हा. कोरोना संकट दूर सारून यंदा गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र देखील दणक्यात साजरी करण्यासाठी तरूणाई सज्ज झाली आहे.
नुकतीच शारदीय नवरात्र सुरू झाली असून आज (३० सप्टेंबर) नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. हा दिवस ललितापंचमी नावे साजरा केला जातो. पाचव्या दिवशी देवीच्या मातृवत्सल रूपाची पूजा केली जाते. माता लालन-पालन करते, म्हणून तिला ललिता म्हटले आहे. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात विशेषतः हे व्रत मोठ्या उत्साहात केलं जातं. या दिवशी देवी ललिता किंवा त्रिपुरा सुंदरीची पूजा केली जाते. त्यानुसार जाणून घेऊया ललिता पंचमी व्रताची तिथी, पूजा मुहूर्त….
ललिता पंचमी व्रत तिथी आणि मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी 29 सप्टेंबर रोजी दुपारी 12:08 वाजता सुरूवात झाली आहे. तर 30 सप्टेंबर रात्री 10:34 वाजता पंचमी तिथी समाप्त होईल. उदयतिथीनुसार, यंदा ललिता पंचमी शुक्रवार 30 सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर देवी ललिता किंवा त्रिपुरा सुंदरी देवीची पूजा करणे खूप फलदायी मानले जाते.
जुळून येत आहे हे शुभ योग
यंदा ललिता पंचमी व्रताच्या दिवशी शुभ योग तयार होत आहेत. त्यानुसार 30 सप्टेंबर रोजी सकाळी 6.13 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 4.19 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्तीसाठी हा उत्तम योग मनाला जातो. यासह पंचमी तिथीच्या पार्श्वभूमीवर रवि योग जुळून येत आहे. मात्र हा योग 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:19 ते 6.14 पर्यंत आहे.
(टीप – वरदिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. zee 24 taas याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)