Makar Sankranti 2024 Bornahan : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सूर्य संक्रमणाचा उत्सव हा मकर संक्रांतीचा दिवस. यंदा मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरा करण्यात येणार आहे. महिलांसाठी हळदीकुंकूचा तर पुरुष मंडळी आणि बच्चे कंपनींमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह असतो. नवीन विवाहित जोडप्यासाठी मकर संक्रांतीचा पहिला सण अतिशय खास असतो. यासोबत मकर संक्रांतीमध्ये बोरन्हाण म्हणजे विदर्भात त्याला लहान मुलांची लूट असं म्हणतात. तर काही ठिकाणी बोरलुट असंही म्हणतात. ही परंपरा आजही साजरी करण्यात येते. बोरन्हाण म्हणजे काय, ती काय साजरी केली जाते त्यामागील शास्त्रीय कारण काय अगदी किती वर्षांपर्यंतच्या लहान मुलाचं बोरन्हाण केलं जातं. यासगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (makar sankranti 2024 bornahan celebrated know reason behind it and its method)


बोरन्हाण म्हणजे काय? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववधूची पहिली मकर संक्रांत असली की, तिला हलव्याचे दागिने घातले जातात. तसंच बोरन्हाणच्या सोहळ्यात लहान मुलांना हलव्याच्या दागिन्यांनी नटवलं जातं. त्याचं औक्षण करुन त्याच्या डोक्यावरून बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या आदी पदार्थ टाकले जातात. हे पदार्थ उपस्थित लहान मुलं लुटतात. या विधीला बोरन्हाण असं म्हटलं जातं. 


बोरन्हाण करण्यामागील आख्यायिका


लहान मुलांचं बोरन्हाण कां करायचं मागे एक आख्यायिका आहे. असं म्हणतात की, करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये म्हणून हा विधी करण्यात येतो. हा विधी सर्वप्रथम करी राक्षसापासून बचावासाठी बाळ गोपाळ कृष्णावर करण्यात आला होता. तेव्हापासून ही प्रथा सुरु झाली आहे. लहान मुलं हे कृष्णाचं रुप मानलं जातं. त्यामुळे करी राक्षसाची सावली आपल्या मुलावर पडू नये म्हणून बोरन्हाण करण्याची परंपरा सुरु झाली. 


बोरन्हाण मागील शास्त्रीय कारण 


ही एक विधी किंवा आख्यायिकाची प्रथा नाही. तर या बोरन्हाणमागे शास्त्रीय कारणही आहे. जे समजल्यावर तुम्ही घरातील चिमुकल्याच बोरन्हाण कराल. मकर संक्रांत ही ऋतु बदलाची चाहुल आहे. लहान मुलांना या बदलत्या ऋतुचा त्रास होऊ नये आणि या ऋतुमधील फळं त्यांनी ख्यावीत म्हणून हा विधी केला जातो. मजा आणि मस्तीमध्ये लहान मुलं न खाणारी फळं या निमित्ताने खातात. 


बोरन्हाणं कधी आणि किती वर्षांपर्यंतच्या मुलाचं करावं?


मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरन्हाण करण्याची परंपरा आहे. मकर संक्रांतीच्या करीदिन हे बोरन्हाणासाठी योग्य दिवस मानला गेला आहे. पण तुम्ही रथ सप्तमीपर्यंत हा सोहळा कधीही करु शकता. 15 जानेवारी 2024 पासून 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्ही कधीही बोरन्हाणं करु शकता. तर 1 वर्षांच्या चिमुकल्यापासून 5 वर्षांच्या मुलांचं बोरन्हाण करतात. लहान मुलांचा कौतुक सोहळा आजकाल मोठ्या थाट्यामाट्यात केला जातो. 


कसं घालायचं बोरन्हाणं?


घरात तुम्ही ज्या ठिकाणी बोरन्हाण करणार आहात ती जागा स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग ठेवा. बाळाला नवीन काळ कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिनी घाला आणि चौरंगावर बसवा. त्यानंतर चिमुकल्याच औक्षण करा. त्याचा डोक्यावरून बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा आणि कुरमुरे एकत्र करुन त्याचं बोरन्हाण करा आणि उपस्थितीत लहान मुलांना ते लुटण्यासाठी सांगा. बोरन्हाण मध्ये वापरण्यात येणारी फळं मुलं इतर वेळी खात नाहीत म्हणून बोरन्हाणच्या माध्यमातून ती फळं त्यांच्या पोटात जातात.


एक गोष्ट आवर्जून लक्ष द्या बोरन्हाण घालताना लहान मुलांना डोक्याला किंवा अंगाला लागू नये म्हणून काळजी घ्या. तुम्ही छान छोटीशी छत्री वापरु शकता. या बोरन्हाणंमध्ये तुम्ही चुरमुरे, लाह्या, छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, रंगीबेरंगी गोळ्या, हल्लीच्या लहान मुलांच्या आवडीचा विचार करून वेगवेगळी चॉकलेट्स, गोळ्या, बिस्कीटे वापरु शकता. 


यावेळी म्हटलं जातं की, बाळावर असंच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे, असा हा लहान मुलांचा मकर संक्रांतीतील एक संस्कार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)