Surya Gochar 2023: सूर्याचा वृषभ राशीत प्रवेश; तब्बल 1 महिना `या` राशींसाठी ठरणार अडचणींचा
Surya Gochar 2023: 15 मे 2023 रोजी सूर्य देव वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Surya Gochar 2023: सूर्य हा सर्व ग्रहांमध्ये सर्वोच्च ग्रह मानला जातो. अशातच सूर्याचं गोचर (Surya Gochar) खास मानलं जातं, कारण सूर्य दर महिन्याला त्याची राशी बदलत असतो. लवकरच सूर्य ग्रह त्याची राशी बदलणार आहे. मेष राशीत असलेला सूर्य आता वृषभ राशीत प्रवेश (Sun enters Taurus) करणार आहे. 15 मे रोजी रात्री 11.32 वाजता सूर्य गोचर करणार आहे.
मुख्य म्हणजे तब्बल एका वर्षानंतर सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. पुढचे जवळपास 30 दिवस सूर्य या राशीत राहणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्मा, पिता, राजकारण इत्यादींचा कारक मानलं जातं. दरम्यान सूर्याचं हे गोचर सर्व 12 राशींवर पूर्णपणे परिणाम करतं. मात्र यावेळी अशा काही राशी आहेत, ज्यांना या काळात कठीण परिस्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास
या राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य गोचर काहीसं कठीण असू शकतं. या काळामध्ये पैशांच्या बाबतीत तुम्ही सतर्क राहिलं पाहिजे. कोणालाही शक्यतो कर्ज देणं टाळलं पाहिजे. इतकंच नाही तर वायफळ खर्च करण्यावर चाप आणला पाहिजे. कुटुंबातील व्यक्तींसोबत काही जमिनीबाबत वाद होऊ शकतात. प्रेमप्रकरणात तुम्हाला खूप सावध राहावं लागण्याची शक्यता आहे. तुमच्या पार्टनरचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्यावी.
मिथुन रास
या राशीच्या व्यक्तींनी सूर्य गोचरच्या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या काळामध्ये तुमचे अनावश्यक खर्च वाढण्याची अधिक शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होऊ शकतो. यावेळी तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो विचार पुढे ढकलणं योग्य ठरेल. मुख्य म्हणजे एखादा आजार तुमच्या मागे लागू शकतो. त्यामुळे तुम्ही यावेळी आजारी पडणार नाही, याकडे लक्ष असावं. वेळ खूप महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे प्रवासात वेळ वाया जाणार नाही, हे पाहावं.
तुळ रास
सूर्याचं हे गोचर कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी अशुभ ठरणार आहे. याशिवाय जुना एखादा कौटुंबिक वाद पुन्हा डोकं वर काढू शकतो. त्यामुळे घरामध्ये कलह होणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. कुठेही पैसे गुंतवताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)