आज पाडवा..जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी आज दिवसभर बाजारपेठेत गर्दी उसळणार आहे.
मुंबई : कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आज उत्साहात साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी आज दिवसभर बाजारपेठेत गर्दी उसळणार आहे.
पाडव्यानिमित्त आज बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. आजच्या दिवशी बलिपूजनला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बलि आणि त्याची पत्नी विंद्यावली यांचे चित्र काढून त्यांची पूजा केली जाते. या दिवसापासून विक्रमसंवत्सराला प्रारंभ होतो. व्यापाऱ्यांच्या नव्या वर्षालाही याच दिवशी सुरुवात होते. अभ्यंगस्नानानंतर या दिवशी स्त्रिया पतीला औक्षण करण्याचेही महत्त्व आहे.
दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात. उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिल) लावला जातो.
घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात हा सण येतो. आश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस या सणाचे असतात. हा सण साधारणपणे ऑक्टोबर - नोव्हेंबर दरम्यान येत असतो. या सणाला भारतात बव्हंश ठिकाणी सुटी असते.
उपलब्ध पुराव्यांनुसार दिवाळी हा सण किमान तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाचा उगम फार प्राचीन काळी आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत ज्यांचा समावेश सात पाकयज्ञ यामध्ये होतो.परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात असे नेमके म्हणता येतेच असे नाही असे मत बी. के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे.