Vastu Tips : मनी प्लांटबाबत `या` चुका अजिबात करू नका; आजच लक्ष द्या
अनेकजण आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच जण घरात मनी प्लांट लावतात.
मुंबई : असं मानलं जातं की, घर किंवा ऑफिसमध्ये झाडं लावल्याने वास्तुशास्त्रात सकारात्मकता येते. अनेकजण त्यांच्या घरात आणि ऑफिसमध्ये मनी प्लांट लावतात. मनी प्लँट्स केवळ तुमच्या घराची शोभा वाढवत नाहीत तर ते लावणंही फार सोपं असतं. एखाद्या बाटलीत तसंच फ्लॉवर पॉटमध्ये देखील ही झाडं लावू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, वृक्षारोपण तुमच्या घरात समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करतं. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बरेच जण घरात मनी प्लांट लावतात. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट लावताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मनी प्लांटबद्दल या चुका करणं टाळा
मनी प्लांट नेहमी योग्य दिशेने लावलं गेलं पाहिजे. ईशान्य दिशेला कधीही हे झाडं ठेवू नये. असं मानलं जातं की, या दिशेला मनी प्लांट लावल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढते शिवाय घरात नकारात्मकताही वाढू लागते. मनी प्लांट नेहमी आग्नेय दिशेला ठेवावं.
अनेकजणं मित्र-मैत्रिणींना मनी प्लांट गिफ्ट करतात. मात्र वास्तूनुसार, मनी प्लांट कधीही इतरांना देऊ नये. ते शुक्र ग्रहाला क्रोधित करतं, असं म्हटलं जातं. शुक्र हे समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे.
मनी प्लांट वेगाने वाढणारी वनस्पती असल्याने त्याच्या वेलींचा जमिनीला स्पर्श होणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी. याच्या वेलींना दोरीचा आधार द्यावा म्हणजे तो वर चढतो. वास्तू शास्त्राप्रमाणे, वाढणारी वेल ही वाढ आणि समृद्धीचं प्रतीक आहे.
वास्तूप्रमाणे, मनी प्लांट सुकू देऊ नका. ड्राय मनी प्लांट हे दुर्दैवाचं प्रतीक मानलं जातं. याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या आर्थिक स्थितीवर होतो. त्यामुळे मनी प्लांटला नियमित पाणी देत राहा.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)