Vatpournima 2022: हिंदू धर्मात पशू पक्ष्यांसह झाडांना विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली केली जाते. या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी सुवासिनी महिला ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला व्रत ठेवतात. या वर्षी 14 जूनला वटपौर्णिमा हा सण आहे. वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश वास असतो, असं मानलं जातं. त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, त्यामुळे हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वट सावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी वट सावित्री व्रत ठेवून विधिनुसार पूजा केल्यास शुभ फळ मिळते. वटवृक्षाचे आयुष्य खूप मोठे असते त्याचप्रमाणे पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी व्रत ठेवलं जातं.


वटपौर्णिमा व्रताचा पूजा मुहूर्त


वटपौर्णिमा व्रत 14 जून रोजी  आहे. पौर्णिमा सोमवार, दिनांक 13 जून रोजी रात्री 9 वाजून 2 मिनिटांपासून सुरू होईल आणि 14 जूनच्या संध्याकाळी 5 वाजून 21 मिनिटांपर्यंत राहील. 14 जून रोजी सकाळी 11 ते 12 वाजून 15 मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. वटपौर्णिमेच्या दिवशी साध्य योग आणि शुभ योगही तयार होत आहेत.


वटपौर्णिमा पूजा पद्धत


वटपौर्णिमा व्रत करणाऱ्या स्त्रियांनी सकाळी नित्यकर्म, स्नान, देवाची नित्य प्रार्थना, तुलसीपूजन करून घ्यावं. लाल रंगाचे किंवा कोणत्याही शुभ रंगाचे कपडे परिधान करून वडाच्या झाडाजवळ जावे. सावित्री आणि सत्यवान आणि यमाच्या मातीच्या मूर्ती वटवृक्षाखाली स्थापित कराव्या. वटवृक्षाच्या मुळास पाणी अर्पण करावे. नंतर मोळी, रोळी, कच्चं सूत, भिजवलेले हरभरे, फुले इत्यादींनी पूजा करावी. यानंतर झाडाभोवती कच्चा धागा गुंडाळा आणि 3 फेऱ्या मारा. 


फेऱ्या मारताना हा मंत्र म्हणावा


"सावित्री ब्रम्हा वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी।


तेन सत्येनमां पाहि दुःखसंसार सागरात।।


अवियोगि यथा देव सवित्र्या सहीतस्य ते।


अवियोग तथास्माकं भूयात् जन्म जन्मनि।।"



पाच सुवासिनींची ओटी भरावी आणि सत्यवान सावित्रीची कथा जरूर ऐकावी. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते, असे सांगितले जाते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)