13 वर्षांचा वैभव सूर्यवंशी IPL ऑक्शनमध्ये झाला करोडपती, `या` संघाने लावली बोली
वैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला.
IPL 2025 Mega Auction : इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून बऱ्याच नव्या तरुण खेळाडूंना संधी मिळाली असून आयपीएल संघांनी लावलेल्या बोलीमुळे यापैकी अनेकांवर पैशांचा पाऊस पडला आहे. वैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला. वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) ऑक्शन टेबलवर येताच त्याच्यासाठी आयपीएल (IPL 2025) संघांनी करोडो रुपयांची बोली लावली. त्यामुळे 13 वर्षांच्या वैभवने अनेक दिग्गजांना मागे सोडलं आहे.
कोण आहे वैभव सूर्यवंशी?
यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याचे वय 13 वर्षे असून त्याचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. वैभव सूर्यवंशी या ऑल राउंडर खेळाडूने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन चार दिवसीय रेड-बॉल क्रिकेट सामने खेळणाऱ्या भारताच्या अंडर-19 संघाचा वैभव देखील भाग होता. यावेळी त्याने शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वैभवने आतपर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5 सामने खेळून 100 धावा केल्या असून गोलंदाजी करताना 1 विकेट सुद्धा मिळवली आहे.
वैभवसाठी राजस्थान आणि दिल्लीमध्ये रंगली फाईट :
वैभव सूर्यवंशीने मेगा ऑक्शनमध्ये त्याचं नाव 30 लाखांच्या बेस प्राईजवर नोंदवल होतं. हा युवा खेळाडू जेव्हा ऑक्शनमध्ये आला तेव्हा त्या खरेदी करण्यासाठी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये चुरस पाहायला मिळाली. दोन्ही संघ वैभवला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असल्याने त्याची बोली 1 कोटींपर्यंत आली. अखेर राजस्थान रॉयल्सने बाजी मारून वैभव सूर्यवंशीवर 1.10 कोटींची बोली लावून त्याला खरेदी केले. त्यामुळे वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमधील सर्वात तरुण करोडपती खेळाडू ठरला आहे. वैभवला आता माजी भारतीय प्रशिक्षक आणि महान क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्याकडून क्रिकेट शिकण्याची संधी मिळणार आहे.