Joginder Sharma Retired: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) अष्टपैलू खेळाडू जोगिंदर शर्माने निवृत्ती (Joginder Sharma Retirement) जाहीर केली आहे. भारताला टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकून देण्यात जोगिंदर शर्माने मोलाची भूमिका निभावली होती. जोगिंदर शर्माने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून आपण निवृत्त घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मूळचा हरियाणाचा असणारा जोगिंदर सध्या पोलीस (Haryana Police) दलात कार्यरत असून डीएसपी (DSP) पदावर आहे.
 
जोगिंदर शर्माने 2017 मध्ये शेवटचा प्रथमश्रेणी सामना खेळला होता. जोगिंदर शर्माने निवृत्ती जाहीर केली नव्हती, पण स्थानिक क्रिकेटमध्येही सक्रीय नव्हता. 2011 मध्ये अपघात झाल्यानंतर जोगिंदर शर्माचं क्रिकेट करिअर धोक्यात आलं होतं. पण 2012-13 मध्ये त्याने पुनरागमन केलो होतं. काही मालिकांनंतर जोगिंदरने क्रिकेट खेळणं बंद केलं होतं आणि नोकरीवर लक्ष देण्यास सुरुवात केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"अपार कृतज्ञता आणि नम्रतेने मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. २००२-२०१७ हा माझा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास होता. खेळातील सर्वोच्च स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी सन्मानजनक होतं," असं जोगिंदरने ट्वीट केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 



जोगिंदरने यावेळी बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, चेन्नई सुपर किंग्स, हरियाणा सरकारचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत. जोगिंदरने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये प्रत्येकी 4 सामने खेळले आहेत. याशिवाय आयपीएलमध्ये त्याने फक्त चेन्नईकडून 16 सामने खेळले. 


जोगिंदरने फक्त चार टी-20 सामने खेळले असले तरी त्यातील एक सामना वर्ल्डकप फायनलचा होता. 2007 मध्ये पाकिस्तानविरोधातील या सामन्यात जोगिंदरने शेवटची ओव्हर टाकली होती. मिसबाह-उल-हक भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला असल्याने सहज सामना जिंकतील असं चित्र होतं. पण धोनीने विश्वास दाखवत जोगिंदरकडे चेंडू सोपवला आणि तो त्याने सार्थ ठरवत मिसबाहला बाद केलं. क्रिकेटमध्ये जेव्हा कधी टी-20 वर्ल्डकपचा उल्लेख होईल तेव्हा जोगिंदर हे नाव टाळणं अशक्य असेल.