मुंबई : टीम इंडियाने कटकमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करुन वनडे सीरिजही खिशात टाकली. ही मॅच टीम इंडियाची वर्षातलीच नाही तर दशकातलीही शेवटची मॅच ठरली. या संपूर्ण दशकावरच टीम इंडियाचं वर्चस्व राहिलं. २०१० ते २०१९ या कालावधीमध्ये भारताने २४९ वनडे मॅच खेळल्या. यातल्या १५७ मॅचमध्ये भारताचा विजय झाला, तर ७९ मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला. या दशकातल्या सर्वाधिक टाय मॅचही भारताच्याच नावावर राहिल्या. या दशकात भारताच्या ६ मॅच टाय झाल्या आणि ७ मॅचचा निकाल लागला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दशकात सर्वाधिक वनडे मॅच जिंकण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या, इंग्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने भारतापेक्षा जास्त मॅच खेळल्या तरी त्यांना ११३ मॅचच जिंकता आल्या.


२०१०-२०१९ या दशकात ३ वर्ल्ड कप खेळवण्यात आले. यातला २०११ सालचा पहिला वर्ल्ड कप भारताने, २०१५ सालचा दुसरा वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियाने आणि २०१९ सालचा तिसरा वर्ल्ड कप इंग्लंडने जिंकला. या तिन्ही वर्ल्ड कपचं आयोजन करणाऱ्या देशालाच वर्ल्ड कप जिंकण्याचा मान मिळाला.


टीमसोबतच भारतीय खेळाडूंचा दबदबाही या दशकात पाहायला मिळाला. विराट कोहलीने २०१०-२०१९ मध्ये २२७ मॅच खेळून ६०.७९ च्या सरासरीने ११,१२५ रन केले. रोहित शर्माने विराटनंतर दुसरे सर्वाधिक रन केले. रोहितने १८० मॅचमध्ये ८,२४९ रन केले. या दोन्ही खेळाडूंमध्ये २,८७६ रनचं अंतर राहिलं.