23 year Old Cricketer Rape Case: नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघातील फिरकीपटू संदीप लामिछाने याने पहिल्यांदाच त्याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणावर भाष्य केलं आहे. सोशल मीडियावरुन लामिछाने व्यक्त झाला असून त्याने थेट एक इशाराच दिला आहे. जानेवारी 2024 मध्ये काठमांडू जिल्हा न्यायालयाने लामिछानेला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. एका 18 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. लामिछानेला 3 लाख नेपाळी रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय चलनानुसार 1 लाख 80 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून त्याला पीडितेला 2 लाख नेपाळी रुपये भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले आहेत. 


8 वर्षांची शिक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाने हा निकाल दिल्यानंतर नेपाळ क्रिकेट असोसीएशनने तातडीने लामिछानेला निलंबित केलं. लामिछानेला घरगुती तसेच अंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभागी होता येणार नाही असं नेपाळ क्रिकेट असोसीएशनने स्पष्ट केलं. न्यायमूर्ती शिशरराज ढकल यांच्या खंडपीठाने संदीप लामिछाने याला दोषी ठरवून 8 वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर संदीप लामिछाने याला अटक करण्यात आली होती, मात्र गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कोर्टाकडून दिलासा मिळाला होता. संदीप लामिछाने जामिनावर बाहेर होता. गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 12 जानेवारी रोजी पाटण उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात संदीप लामिछानेची 20 लाख रुपयांच्या दंडासह जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. 


प्रत्येकाचं नाव उघड करणार


फेब्रुवारी महिन्यामध्ये लामिछाने याने याचिका दाखल करुन तुरुंगाबाहेर राहण्याची मागणी केली. न्यायालयाने ही याचिका स्वीकारली. "मी न्यायालयाच्या निर्देशांचा आणि कायद्याचा सन्मान करतो. मात्र मी प्रत्येकाला आश्वासन देतो की, या प्रकरणामध्ये माझ्याविरुद्ध कट रचण्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावाचा मी लवकरच खुलासा करणार आहे. या गुन्ह्यातील प्रत्येकाचं नाव मी उघड करणार आहे," असं लामिछाने म्हणाला आहे. 



सर्व काही देवावर सोडलं


आपल्याविरुद्ध कट रचण्यात आल्याचा दावा या फिरकीपटूने केला असून शेवटी विजय सत्याचा होईल असा विश्वास लामिछानेने व्यक्त केला आहे. मी सर्व काही देवावर सोडून दिल्याचंही लामिछानेनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे 5 जून पासून सुरु होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेमध्ये नेपाळचा संघ खेळणार आहे. म्हणूनच आता लामिछाने याने पुढील काही आठवड्यांमध्ये या बलात्कार प्रकरणामध्ये संघातील खेळाडू किंवा संघाशी संबंधित कर्मचाऱ्यांचा उल्लेख करत एखादा मोठा गौप्यस्फोट केल्यास संघाला त्याचा फटका बसू शकतो.



सर्वात यशस्वी गोलंदाज; आयपीएलही खेळला


लामिछाने हा नेपाळचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. लामिछानेच्या कामगिरीच्या जोरावर नेपाळच्या संघाला उत्तम कामगिरी करत जगभरातील वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. लामिछानेने 210 विकेट्स घेतल्या आहेत. सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो 103 सामने खेळला आहे. लामिछानेने 14 एकदिवसीय आणि 18 टी-20 सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. तो आयपीएलमध्ये खेळणारा पहिला नेपाळी खेळाडू ठरला. हा 23 वर्षीय क्रिकेटपटू दिल्ली कॅपिटल्सच्या संघाकडून खेळला आहे.