कोलंबो : श्रीलंका ​​क्रिकेट बोर्डमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोंधळ पहायला मिळतोय. या देशातील क्रिकेटर्स आणि बोर्डामध्ये संबंध ताणले गेल्याची चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही खेळाडू लीग क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करतायत. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या बोर्डाने आपल्या देशातील क्रिकेटपटूंसाठी कठोर नियम जारी केले आहेत. ज्यामध्ये हे खेळाडू त्यांच्या इच्छेने निवृत्ती घेऊ शकणार नाहीत.


कडक नियमांमुळे उडाली खळबळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा असणाऱ्या श्रीलंकेच्या खेळाडूंना आता तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागणार आहे. त्याचसोबत फ्रँचायझी-आधारित T20 लीगमध्ये खेळण्याचं असेल तर ना हरकत प्रमाणपत्रासाठी निवृत्तीनंतर सहा महिने प्रतीक्षा करावी लागेल. 


श्रीलंका क्रिकेटने खेळाडूंना अकाली निवृत्ती आणि किफायतशीर T20 डोमेस्टिक लीगमध्ये खेळण्यास रोखण्यासाठी या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार, लंका प्रीमियर लीगमध्ये खेळण्यास पात्र होण्यासाठी, खेळाडूंना एका सीजनमध्ये किमान 80 टक्के सामने खेळावे लागणार आहेत.


अचानक अनेक खेळाडू झाले निवृत्त


दनुष्का गुणतिलक आणि भानुका राजपक्षे यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर लंका प्रीमियर लीगने हा निर्णय घेतला आहे. गुणतिलक यांनी कसोटीमधून तर राजपक्षे यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली.


यानंतर लंका प्रीमियर लीगने निवेदन जारी केलं. या निवेदनात "राष्ट्रीय क्रिकेट टीमतून निवृत्त होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना श्रीलंका क्रिकेटला निवृत्तीची तीन महिन्यांची नोटीस द्यावी लागेल. त्याप्रमाणे विदेशी फ्रेंचायझी लीगमध्ये खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र हवं असल्यास ते निवृत्ती घेतलेल्या तारखेपासून सहा महिन्यांनंतरच दिलं जाईल," असं नमूद करण्यात आलं आहे.


बोर्डाने म्हटलंय की, "निवृत्त राष्ट्रीय खेळाडूंनी लीगच्या आधीच्या हंगामात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये 80 टक्के सामने खेळले तरच ते LPLसारख्या देशांतर्गत लीगमध्ये ते खेळण्यास पात्र असतील."