क्रिकेटपटू श्रीसंथच्या घरात आग; कुटुंब थोडक्यात बचावले
शेजारच्या लोकांनी श्रीसंथच्या घरातून धूर येत असल्याचे पाहून अग्निशमन दलाला पाचारण केले.
कोची: भारताचा क्रिकेटपटू श्रीसंथ याच्या घराला शनिवारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत श्रीसंथच्या घरातील हॉल आणि बेडरूम जळून खाक झाला आहे. मात्र, सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
श्रीसंथ हा इडापल्ली येथे वास्तव्याला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा श्रीसंथ घरी नव्हता. रात्री दोनच्या सुमारास अचानक घराच्या तळमजल्यावर आग लागली. त्यावेळी घरात श्रीसंथची पत्नी, दोन मुली आणि दोन नोकर होते. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्वांनी वरच्या मजल्यावर धाव घेतली.
शेजारच्या लोकांनी श्रीसंथच्या घरातून धूर येत असल्याचे पाहून अग्निशमन दलाला पाचारण केले. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना घरातील काचेचा दरवाजा फोडून या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी ठरलेल्या श्रीसंथवरील आजीवन बंदी बीसीसीआयकडून नुकतीच मागे घेण्यात आली होती. त्याऐवजी बंदीचा कालावधी सात वर्षांचा म्हणजे २०२० पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. यानंतर श्रीसंथने केरळच्या संघातून रणजी चषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली. या माध्यमातून श्रीसंथ लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी आशा त्याच्या चाहत्यांना आहे.