ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचचा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये विशाल स्कोअर
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं केला आहे.
हरारे : आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या अॅरोन फिंचनं केला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या मॅचमध्ये फिंचनं १७२ रनची खेळी केली. फिंचचं हे वादळी शतक आणि अॅण्ड्रयू टायच्या (३/१२) बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलियानं झिम्बाब्वेचा १०० रननी पराभव केला. फिंचनं ७६ बॉलमध्ये १६ फोर आणि ४ सिक्स लगावल्या. फिंचनं २२ बॉलमध्ये त्याचं अर्धशतक आणि ५० बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे. याआधी फिंचच्याच नावावर हा विक्रम होता. २०१३ साली इंग्लंडविरुद्ध त्यानं १५६ रनची खेळी केली होती.
फिंचनं आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये सर्वाधिक रन केल्या असल्या तरी टी-२० क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन करण्याचं रेकॉर्ड मात्र फिंचला मोडता आलं नाही. क्रिस गेलनं २०१३ साली आयपीएलमध्ये नाबाद १७५ रनची खेळी केली होती. आजही टी-२० क्रिकेटमधला हा सर्वाधिक स्कोअर आहे.
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधला सर्वाधिक स्कोअर
अॅरोन फिंच- १७२ रन- ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे- २०१८
अॅरोन फिंच- १५६ रन- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड- २०१३
ग्लेन मॅक्सवेल- १४५ नाबाद रन- ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका- २०१६
एव्हिन लुईस- १२५ नाबाद रन- वेस्ट इंडिज विरुद्ध भारत- २०१७
शेन वॉटसन- १२४ नाबाद रन- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत- २०१६
या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं पहिले टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करताना ऑस्ट्रेलियानं २ विकेट गमावून २२९ रन केले. यानंतर झिम्बाब्वेनं २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १२९ रन केले. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान आणि झिम्बाब्वमध्ये सध्या टी-२० ट्राय सीरिज सुरु आहे.