मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलं आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक, अर्धशतक आणि १५० रन बनवण्याचा विक्रम एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहेत. मिस्टर ३६० डिग्री नावानं ओळखल्या जाणारा एबी डिव्हिलियर्स मैदानाच्या चारही दिशांना शॉट मारण्यात पटाईत होता. एबीच्या अशा खेळामुळे बॉलरही कुठे बॉल टाकयचा याच विचारात असायचे. एबीनं वनडेमध्ये २५ शतकं आणि ५३ अर्धशतकं केली होती. वनडेमध्ये एबीच्या याच रेकॉर्डमुळे दक्षिण आफ्रिकेला २०१९चा वर्ल्ड कप जिंकण्याची आशा होती. एबीनंही दक्षिण आफ्रिकेसाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न बघितलं होतं. पण त्याचं हे स्वप्न आता पूर्ण होणार नाही. एबी दक्षिण आफ्रिकेकडून २००७, २०११ आणि २०१५ सालचा वर्ल्ड कप खेळला होता, पण हा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिकेला जिंकता आला नाही.


आफ्रिकेच्या दिग्गजांना वर्ल्ड कपची हुलकावणी


वर्ल्ड कपनं हुलकावणी दिलेला एबी डिव्हिलियर्स हा दक्षिण आफ्रिकेचा एकमेव खेळाडू नाही. आफ्रिकेच्या अनेक दिग्गजांचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न कायमच भंगलं. दक्षिण आफ्रिकेला अजून एकही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. हॅन्सी क्रोनिए, जॅक कॅलिस, हर्षल गिब्स, ग्रॅम स्मिथ, शेन पोलॉक या दिग्गजांनाही वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. १९९५ साली दक्षिण आफ्रिकेनं पहिला वर्ल्ड कप खेळला. तेव्हापासून दक्षिण आफ्रिकेनं ६ वर्ल्ड कप खेळले.