`बुमराह बेबी बॉलर`; पाकिस्तानी खेळाडूची टीका
गेल्या २ वर्षांमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक बॉलिंगने जगभरात नाव कमावलं आहे
लाहोर : गेल्या २ वर्षांमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक बॉलिंगने जगभरात नाव कमावलं आहे, पण पाकिस्तानचा ऑलराऊंडर खेळाडू अब्दुल रझाकने बुमराहवर टीका केली आहे. मी ग्लेन मॅक्ग्रा आणि वसीम अक्रमसारख्या बॉलरसमोर खेळलो आहे, त्यामुळे बुमराह माझ्यासमोर लहान मुलगा आहे. बुमराहच्या बॉलिंगवर मी अगदी सहज खेळलो असतो, असं रझाक म्हणाला आहे.
मी जगातल्या सर्वोत्तम बॉलरविरुद्ध खेळलो आहे. बुमराहविरुद्ध खेळताना मला कोणत्याही प्रकारची अडचण आली नसती. उलट माझ्याविरुद्ध खेळताना तोच दबावात आला असता, असं वक्तव्य रझाकने केलं आहे.
अब्दुल रझाकने १९९९ ते २०१३ या कालावधीत पाकिस्तानविरुद्ध ४६ टेस्ट, २६५ वनडे आणि ३२ टी-२० मॅच खेळल्या. रझाकने १५ नोव्हेंबर २०१३ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुबईमध्ये शेवटची टी-२० मॅच खेळली, त्यानंतर रझाक मैदानात दिसला नाही. याआधीही रझाक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आला होता. ५-६ मुलींसोबत माझे विवाहबाह्य संबंध होते, असं रझाक म्हणाला होता.
बुमराहबद्दल ही प्रतिक्रिया दिली असली तरी रझाकने त्याचं कौतुकही केलं आहे. बुमराह चांगलं करतोय, त्याच्या कामगिरीमध्येही सुधारणा होत आहे. बुमराहची ऍक्शन थोडी अजब आहे आणि त्याचा बॉल सीमवर चांगल्या पद्धतीने पडतो, त्यामुळे तो आणखी प्रभावशाली आहे, असं रझाकने सांगितलं.
जसप्रीत बुमराह हा वनडे क्रमवारीत बॉलरच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुखापतीमुळे बुमराह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये खेळू शकला नाही. बुमराहने ५८ वनडेमध्ये १०३ विकेट घेतल्या आहेत. तर ४२ टी-२० मॅचमध्ये त्याला ५१ विकेट मिळाल्या आहेत.