मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घेषणा केली. लॉकडाऊनमुळे देशात सर्व व्यवसाय ठप्प झाले होते. शिवाय विमान सेवा देखील बंद होत्या. त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू रँडी जुआन म्युलर मुंबईच्या विमान तळावर चक्क ७२ दिवस अडकला होते. मुळचा घाना येथून आलेला हा खेळाडू त्याच्या आयुष्यातील हे ७२ दिवस कधीच विसरू शकत नाही. या ७२ दिवसांसाठी मुंबईचं विमानतळ त्याच्यासाठी घर होतं, तर सीआयएसएफ अधिकारी त्याच्यासाठी त्याचे कुटुंब होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्युलरने आपल्या परिस्थितीबाबत एक ट्विट केले होते. एक आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू मुंबईच्या विमानतळावर अडकल्याचे समजताच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्युलरच्या मदतीसाठी एक हात पुढे केला. त्यांनी त्याची राहण्याची सोय वांद्रे येथील लकी हॉटेलमध्ये केली असून म्युलरला कपडे आणि सर्व दैनंदिन वस्तू देण्यात आल्या आहेत.


 फुटबॉलपटू रँडी जुआन म्युलर नोव्हेंबर २०१९ मध्ये केरळमधील ओआरपीसी स्पोर्ट्स क्लबकडून खेळण्यासाठी कुमासीच्या घानियान शहरातून भारतात आला होता. एका सामन्यासाठी त्याला २ ते ३ हजार रूपये मिळत होते. फुटबॉलखेळाच्या प्रेमापोटी त्याने म्युलरने जवळपास दीड लाख रुपये खर्च केले होते. पण जेव्हा त्याला भारतात लॉकडाऊन आहे असं कळालं तेव्हा त्याने परत जाण्याचा निर्णय घेतला. असं वक्तव्य खुद्द म्युलरने केलं आहे. 


परंतु लॉकडाऊनमुळे सर्व विमान वाहतूक बंद केल्यामुळे त्याने मुंबई विमानतळालाच ७२ दिवस आपले घर केले. यादरम्यान त्याला सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी फार मदत केली. या काळात तो ७२  दिवस फक्त समोसा आणि  तळलेला भात खावून  आपले पोट भरत होता. अशा सर्व परिस्थितीचा सामना करत असताना त्याने कधी आपला आत्मविश्वास कमी होवू दिला नाही. आता तो पुन्हा आपल्या मायदेशी परतण्याच्या प्रयत्नात आहे.