VIDEO: मदत करावी तर अशी! दिवाळीसाठी फुटपाथवर झोपलेल्यांना अफगाणिस्तानच्या खेळाडूनं गुपचूप वाटले पैसे
Viral Video : वर्ल्डकप 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने प्रभावित करणारा अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज मैदानाबाहेरही चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
World Cup : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने या विश्वचषकात (World Cup 2023) अप्रतिम कामगिरी केली आहे. एकामागून एक अनेक चॅम्पियन संघांना पराभूत करून अफगाणिस्तानने (Afghanistan) आपण आता कोणत्याही संघाला पराभूत करण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. अफगाणिस्तानचा संघ प्रथमच उपांत्य फेरीच्या शर्यतीपर्यंत पोहोचला होता. वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा स्थान मिळवू शकला नाही. अफगाणिस्तान संघाला भारतीय प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनाही भारतातील जनतेने भरभरून प्रेम दिले आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानचे खेळाडू फॉर्मात आहेत. मैदानावर फलंदाजी आणि गोलंदाजीत चांगली करत असताना अफगाणिस्तानचे खेळाडू मैदानाबाहेरही मनाचा मोठेपणा दाखवत आहेत. अफगाणिस्तानच्या अशाच एका खेळाडूने रस्त्यावर झोपणाऱ्या लोकांची गुपचूप मदत केली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याने अहमदाबादच्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांकडे जाऊन त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे दिले. मात्र गुरबाजला त्याच्या या मदतीसाठी कोणतीही प्रसिद्धी करावी लागली नाही. व्हायरल व्हिडीओनुसार, अहमदाबादच्या रस्त्यावर राहणाऱ्या गरीब लोकांकडे गुरबाज रात्री तीन वाजता एकटाच गेला होता. सगळे झोपले होते, फक्त एकच महिला जागी होती. गुरबाजने गाढ झोपेत असलेल्या लोकांच्या शेजारी 500-500 च्या नोटा ठेवल्या. त्यावेळी जागे झालेल्या महिलेच्या हातात पैसे दिले आणि नंतर शांतपणे तो गाडीतून निघून गेला. त्याचवेळी एका व्यक्तीने गुरबाजला ओळखले आणि त्याला पैसे वाटताना पाहिले. या घटनेचा त्या व्यक्तीने व्हिडिओ बनवला. गुरबाज तिथून निघून गेल्यावर ती व्यक्ती गरीब लोकांच्या जवळ गेली आणि गुरबाजने सर्व झोपलेल्या गरिबांना पैसे कसे वाटले ते व्हिडीओमध्ये दाखवले. सकाळी उठून दिवाळी साजरी करता यावी म्हणून गुरबाजने लोकांना पैसे दिले होते.
दरम्यान, रहमानउल्ला गुरबाजचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरबाजला भारतीय क्रिकेट चाहते पसंत करतात. अफगाणिस्तानचा सर्वात लोकप्रिय खेळाडू राशिद खान व्यतिरिक्त, रहमानउल्ला गुरबाज देखील दरवर्षी किमान दोन महिने भारतात राहतो. गुरबाज गुजरात टायटन्ससाठी क्रिकेट खेळला होता. त्यामुळे गुरबाज याचे अहमदाबादशी खास नाते आहे.