दुबई : आयसीसीने नुकतीच टेस्ट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये तब्बल १३ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या बॉलरला पहिला क्रमांक मिळवण्यास यश आले आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकताच दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेमध्ये टेस्ट मॅच झाली. या सामन्यानंतर आयसीसीने टेस्ट क्रमवारी जाहीर केली.  यात पॅट कमिन्सने दक्षिण आफ्रिकेच्या कगीसो रबाडाला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ग्लेन मॅक्रेगाने २००६ साली या यादीत पहिल्या क्रमांक मिळवला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच बॉलरला पहिला क्रमांक गाठता आला नव्हता. आयसीसीच्या ताज्या आकडेवारीनुसार  पॅट कमिन्स ८७८ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर  ८६२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जेम्स एंडरसन आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ८४९ गुणांसह दक्षिण आफ्रिकेच्या कगीसो रबाडा आहे. 


भारतीय गोलंदाज


या क्रमवारीत भारताच्या दोन फिरकीपटूंचा समावेश आहे. यात पाचव्या क्रमांकावर रविंद्र जडेजा तर दहाव्या क्रमांकावर आर आश्विन आहे. या खालोखाल मोहम्मद शमी १४ व्या, जसप्रीत बुमराह हा १६ व्या,  इशांत शर्मा २८ व्या तर उमेश यादव ३१ व्या क्रमांकावर आहे.  विशेष म्हणजे टेस्ट बॉलरच्या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेला रविंद्र जडेजा हा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.  या यादीत पहिल्या क्रमांकावर जेसन होल्डर आणि दुसऱ्या क्रमांकावर शाकिब अल हसन आहे.