IPL स्लेजिंगनंतर विराट- सूर्यकुमार पुन्हा आमनेसामने
अनेकांच्या नजरा वळल्या
मुंबई : यंदाचा आयपीएलचा IPL 2020 हंगाम अनेक कारणांनी गाजला. त्यापैकीच एक कारण म्हणजे सूर्यकुमार यादवची दमदार खेळी. एकिकडे सूर्यकुमारनं मुंबईच्या संघात दिलेल्या योगदानाची वाहवा होत असतानाच दुसरीकडे विराट आणि त्याच्यात झालेल्या स्लेजिंगचीही बरीच चर्चा झाली.
असे चर्चेत असणारे हे दोन्ही खेळाडू पुन्हा एकदा आमनेसामने आले. ज्यामुळं अनेकांच्याच नजरा त्यांच्या दिशेनं वळल्या. यावेळी निमित्त होतं ते म्हणजे विराटनं केलेलं एक ट्विट.
विराटनं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज हे क्रिकेटच्या सराव सत्रादरम्यान गोलंदाजीचा अभ्यास करताना दिसत आहेत. विराटनं हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कर्णधार कोहलीच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आपलीही उत्सुकता आणि कुतूहल व्यक्त केलं. मुख्य म्हणजे यापूर्वीही सूर्यकुमारनं विराटची प्रशंसा केली आहे. त्यामुळं आता त्याची ही प्रतिक्रिया पाहता मैदानातील ते स्लेजिंग प्रकरण तिथंच संपलं असं म्हणायला हरकत नाही.
त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?
आरसीबी आणि मुंबई इंडियन्स दरम्यान 28 ऑक्टोबरच्या हाय-व्होल्टेज सामन्यात विराट कोहलीने सूर्यकुमार यादवविरूद्ध नकारात्मक रणनीती वापरल्याचं पाहायला मिळालं होतं. विराट हा सूर्यकुमारच्या जवळ यायचा आणि त्याच्याकडे रागाने पाहायचा. पण सूर्यकुमार यादव विचलित झाला नाही. त्याने आरसीबीच्या कर्णधारांच्या स्लेजिंगकडे दुर्लक्ष केलं होतं.
सूर्यकुमार यादवने 43 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 79 धावांची खेळी केली. ज्यामुळे मुंबई संघाचा विजय झाला. सूर्यकुमारने कोहलीकडे पाहिलं आणि विचारलं, 'सर्व काही ठीक आहे ना?'.
एकिकडे कोहलीची ही वागणूक अनेक क्रिकेट चाहत्यांना खटकली तर, अनेकांनी सूर्यकुमारच्या संयमाचं कौतुक केलं होतं.