`नीरजला माझा एवढाच मेसेज आहे की, आपली...`; ऑलिम्पिक गोल्ड विजेत्या पाकिस्तानी नदीमचा Video
Arshad Nadeem Message To Neeraj Chopra: पाकिस्तानच्या नदीमने भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावलं. सलग दोन सुवर्णपदकं जिंकण्याचं नीरज चोप्राचं स्वप्न यामुळे भंग पावलं.
Arshad Nadeem Message To Neeraj Chopra: पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने पाकिस्तानी क्रीडाप्रेमींना अगदीच अनपेक्षित सुखद धक्का देत सुवर्णपदक पटकावलं. नदीमने ऑलिम्पिकमधील सर्व विक्रम मोडीत काढत 92.97 मीटरवर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. खरं तर नदीमने आपल्या 6 प्रयत्नांपैकी दोनमध्ये 90 मीटरहून अधिक दूर भाला फेकला. मात्र त्याने दुसऱ्या प्रयत्नात फेकलेल्या भाल्यानेच सुवर्णवेध घेतला. पाकिस्तानच्या इतिहासामध्ये कोणत्याही वैयक्तिक ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नदीम हा पाहिला खेळाडू ठरला आहे. पाकिस्तानचं हे ऑलिम्पिकमधील एकंदरित चौथं सुवर्णपदक ठरलं आहे. अन्य तीन पदकं त्यांनी हॉकीमध्ये मिळवली आहेत. 1992 सालानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला सुवर्णपदकावर नाव कोरता आलं आहे. त्यामुळे अर्शद नदीमचं हे पदक अनेक अर्थांनी पाकिस्तानसाठी खास आहे.
नीरजचे पाच प्रयत्न फाऊल
मात्र त्याचवेळी दुसरीकडे भारताच्या नीरज चोप्राला सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आलं असून तो यंदा दुसऱ्या स्थानी राहिला. नीरजला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. नीरजने 89.45 मीटवर भालाफेक करत दुसरं स्थान निश्चित केलं. नीरजनेही दुसऱ्या प्रयत्नातच पदक मिळवून देणारी कामगिरी केली. नीरजचे अन्य पाचही प्रयत्न फाऊल ठरले. नीरजविरुद्ध मैदानात असतानाच मागील सहा स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच नदीम अधिक सरस ठरला आणि थेट ऑलिम्पिकचं सुवर्णपदक घेऊन गेला.
नदीमला नवा भाला मिळत नव्हता तेव्हा नीरजने...
खरं तर क्षेत्र कोणतंही असो भारत विरुद्ध पाकिस्तान म्हटल्यावर चाहत्यांनाही वेगळाच चेव फुटतो. हे भालाफेकीसंदर्भातही लागू होतं. मात्र स्वत: नदीम आणि नीरज हे दोघेही उत्तम स्पर्धक आणि मित्र आहेत. दोघांनीही एकमेकांचं अनेकदा कौतुक केलं आहे. ऑलिम्पिकच्या आधी नदीमला नवीन भाला मिळवण्यात अपयश येत असल्याचं पाहून नीरजने आश्चर्य व्यक्त केललं. "त्याला नवा भाला मिळत नाहीये हे आश्चर्यचकित करणारं आहे. त्याच्या कौशल्याला न्याय मिळायला हवा. हा काही फार मोठा प्रश् नाहीये. नदीम हा अव्वल दर्जाचा भालाफेकपटू आहे. मला असं वाटतं की भाला बनवणारी कोणतीही कंपनी त्याला स्पॉन्सरशीप देण्यास तयार होईल. हवं तर हा माझ्याकडून दिलेला सल्ला समजा," असं नीरज म्हणाला होता.
नदीम काय म्हणाला?
ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर नदीमचं नीरजसंदर्भातील एक जुनं विधान व्हायरल होत आहे. त्यावेळेस नदीमने, "नीरजला माझा एवढाच मेसेज आहे की आपली मैत्री पुढेही अशीच बहरत रहावी आणि लोक चांगल्या शब्दांमध्ये आपली आठवण काढत राहो," असं म्हटलं होतं.
नीरजने केलं नदीमचं अभिनंदन
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये नदीमने सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरजनेही त्याचं अभिनंदन केलं आहे. "आजची स्पर्धा फार उत्तम ठरली. अर्शद नदीम हा उत्तम खेळला. त्याचं आणि त्याच्या देशाचं अभिनंदन," असं नीरज रौप्यपदक जिंकल्यानंतर म्हणाला.