मुंबई : अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाल्यावर टीम आणि प्रशिक्षक राहुल द्रविडवर कौतुकाचा वर्षाव झाला. यानंतर बीसीसीआयनंही टीमचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर बक्षिस दिलं. बीसीसीआयनं दिलेल्या या बक्षिसावर राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयनं कोच राहुल द्रविडला 50 लाख रुपये, सपोर्ट स्टाफला 20- 20 लाख रुपये आणि संघातील खेळाडूंना 30 -30 लाख रुपये बक्षिस जाहीर केलं होतं. पण या रकमेवर राहुल द्रविड नाराज होता. खेळाडू आणि इतर सपोर्ट स्टाफपेक्षा मला जास्त रक्कम का दिली असा सवाल राहुल द्रविडनं बीसीसीआयला विचारला होता.


बीसीसीआयनं ऐकला द्रविडचा सल्ला


द्रविडची ही नाराजी अखेर बीसीसीआयनं दूर केली आहे. इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय अंडर १९ टीमच्या प्रत्येक सपोर्ट स्टाफला २५ लाख रुपये देणार आहे. एवढच नाही तर मागचं एक वर्ष अंडर १९ टीम तयार करणाऱ्यांनाही एवढीच रक्कम देण्यात येईल. यामुळे २०१७ साली निधन झालेल्या राजेश सावंत यांच्या कुटुंबियांनाही ही रक्कम मिळणार आहे.


राहुल द्रविड, पारस म्हांब्रे, अभय शर्मा, योगेश परमार, आनंद दाते, मंगेश गायकवाड, देवराज राऊत, डब्ल्यू.व्ही.रमन, मनुज शर्मा, सुमित मल्हापूरकर, अमोघ पंडित आणि राजेश सावंत यांच्या कुटुंबाला २५ लाख रुपये मिळणार आहेत.


बीसीसीआयशी केलेल्या करारानुसार अंडर १९ टीमचा प्रशिक्षक म्हणून द्रविडला प्रत्येक वर्षी ४ कोटी रुपये मिळतात. बीसीसीआय आणि राहुल द्रविडमध्ये ३ वर्षांचा करार झाला आहे.