कोलकाता : भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याने एमएस धोनीबद्दल भाकीत वर्तवलं आहे. 'वर्ल्ड कपनंतरही धोनी क्रिकेट खेळू शकतो. वयाचा आणि खेळाचा काहीही संबंध नाही', असं गांगुली पीटीआयशी बोलताना म्हणाला. वर्ल्ड कपनंतर धोनी निवृत्त होईल, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. पण गांगुलीला मात्र धोनी निवृत्त होईल, असं वाटत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'भारतानं वर्ल्ड कप जिंकला आणि धोनीनं सातत्यपूर्ण कामगिरी केली तर त्यानं निवृत्त का व्हावं? प्रतिभा असेल तर वय महत्त्वाची गोष्ट नसते' असं गांगुलीला वाटतं.


'भारताची सध्याची फास्ट बॉलिंग ही सर्वोत्तम आहे. वर्ल्ड कपमध्ये बुमराह आणि मोहम्मद शमीची जोडी महत्त्वाची भूमिका बजावेल. भुवनेश्वर कुमारबरोबर उमेश यादव चौथा फास्ट बॉलर म्हणून वर्ल्ड कपला जाईल', असं सौरव गांगुली म्हणाला.


'शिखर धवन सध्या खराब फॉर्ममध्ये असला तरी तो रोहित शर्माबरोबर ओपनिंगला खेळेल, असा विश्वास गांगुलीनं व्यक्त केला. विराट कोहलीनं तिसऱ्या क्रमांकावर, रायुडूनं चौथ्या क्रमांकावर त्यानंतर केदार जाधव आणि मग धोनीनं बॅटिंग करावी', असा सल्ला गांगुलीनं दिला आहे.


विजय शंकरच्या चांगल्या कामगिरीमुळे निवड समितीची डोकेदुखी वाढली असेल. पण रवींद्र जडेजाची निवड करायची म्हणून विजय शंकरला वगळू नका. जडेजाऐवजी विजय शंकरला संधी द्या. नागपूरच्या मॅचमध्ये केलेल्या कामगिरीमुळे विजय शंकरनं वर्ल्ड कप टीममध्ये निवड होण्याची आपली पात्रता आहे हे दाखवून दिलं', असं गांगुलीनं सांगितलं.


'या वर्ल्ड कपमध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळेल. भारत, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंका या वर्ल्ड कपसाठी जिंकण्यासाठीच्या प्रबळ दावेदार आहेत. श्रीलंकेनं नुकताच दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. तर वेस्ट इंडिज इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करत आहे', अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.


'ऑस्ट्रेलिया सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. पण स्मिथ आणि वॉर्नरच्या पुनरागमनानंतर त्यांची टीमही मजबूत होईल,' असं विधान गांगुलीनं केलं. तसंच गांगुलीनं वर्ल्ड कपसाठीची त्याच्या पसंतीची भारतीय टीमही सांगितली.


सौरव गांगुलीची भारतीय टीम


रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, अंबाती रायुडू, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव