बहुत नाईंसाफी है..., देशासाठी इतकं करुनही अजिंक्य रहाणेच्या नशिबी हे काय?
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
मुंबई : दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. सेंच्युरियन ग्राऊंडवर टीम इंडियाने आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. 3 जानेवारीपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून यामध्ये मराठमोळ्या अजिंक्य रहाणेचा टीममध्ये समावेश होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
अजिंक्य रहाणेचा सध्या फ्लॉप शो सुरु आहे. अजिंक्य रहाणेने सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 48 रन्स तर दुसऱ्या डावात 20 रन्स केले. अजिंक्य रहाणेच्या या खराब कामगिरीनंतर आता जोहान्सबर्ग मधील दुसऱ्या कसोटीत त्याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार विराट कोहली यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी दिली होती. मात्र रहाणे या संधीचा फायदा उठवण्यात अपयशी ठरला. यानंतर आता रहाणेची कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता अधिक आहे.
सेंच्युरियन कसोटीच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेला अर्धशतकही झळकावता आलं नाही. केएल राहुल आऊट झाल्यावर रहाणेकडून काही मोठी खेळी खेळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्याने 102 बॉल्समध्ये 48 रन्स केले.
अजिंक्य रहाणेचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता फारत कमी आहे. त्याची कारकीर्द शेवटच्या टप्प्यावर आली असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. रहाणेने शेवटचं कसोटी शतक ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये झळकावलं होतं. त्याला एक वर्षही उलटून गेलं मात्र त्यानंतर अजूनही रहाणेला मोठी खेळी करता आली नाही.