मी पुन्हा कमबॅक....; आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर अजिंक्य रहाणेचं मोठं वक्तव्य
दुखापतीनंतर अजिंक्य रहाणे इंडियन प्रीमियर लीगचे उरलेले सामने खेळणार नाहीये.
मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा ओपनर आणि मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे आयपीएलच्या यंदाच्या सिझनमधून बाहेर पडला आहे. पहिल्यांदा त्याला खराब कामगिरीमुळे प्लेईंग 11 मधून डावलण्यात आलं. मात्र आता दुखापतीनंतर तो इंडियन प्रीमियर लीगचे उरलेले सामने खेळणार नाहीये. केकेआरने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. याचवेळी रहाणेने पुढच्या वर्षी जबरदस्त कमबॅक करण्याचं म्हटलं आहे.
डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, अजिंक्य रहाणेच्या स्नायूंमध्ये दुखापत झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्सने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करून रहाणेने सीझन सोडल्याची माहिती दिली आहे. याशिवाय अजिंक्य रहाणेने पुढच्या वर्षी उत्तम पद्धतीने पुनरागमन करण्याचा दावा केला आहे.
केकेआरने केलेल्या ट्विटमध्ये, अजिंक्य रहाणे हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने ग्रस्त आहे. त्यामुळे तो आयपीएल 2022 मधून बाहेर पडला आहे. तो लवकर बरा होईल अशी आम्ही आशा करतो. आम्ही तुला मीस करू.
यामध्ये असलेल्या व्हिडीयोमध्ये अजिंक्य रहाणे म्हणतो, मी टीमसोबत मैदानात आणि बाहेर दोन्हीकडे आनंद लुटला आहे. मी या ठिकाणी क्रिकेटर म्हणून खूप काही शिकलो. मी सर्व खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि मॅनेजमेंटच्या लोकांना धन्यवाद देऊ इच्छितो.
नक्कीच मी पुढच्या वर्षी जोमाने कमबॅक करेन. मला विश्वास आहे की, आम्ही पुढच्या सामन्यात एका टीमच्या रूपाने चांगला खेळ करू. मला आशा आहे की, केकेआर प्ले-ऑफमध्ये पोहोचणार आहे, असंही रहाणेने सांगितलं.