Ajinkya Rahane, CSK: हा तर कसोटी प्लेयर रे भावा... कुटला खेळतोय! वय पण झालंय... आता टेकनिक चालतीये कुठं, आयपीएल म्हंजी हाणामारीचा खेळ, याला काय जमणार नाय... तू आपला कसोटीत बरा.., असा एकंदरीत सूर क्रिकेटप्रेमींचा होता. मात्र यंदा पिवळे कपडे घालून तो पुन्हा मैदानात उतरला. पहिल्याच बॉलवर खणखणीत सिक्स आणि सर्वांनी तोंडात बोटं घातली, अशा या अजिंक्य रहाणेने फायनल सामन्यात चेन्नईला दमदार विजय मिळवून दिला अन् सर्वांच्या लाडक्या अज्जूने अखेर नावावर लागलेला मोठा कलंक मिटवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गबाळ्यांसारखं शर्ट सोडून कधी मैदानात उतरायचं नाही, असा त्याचा नियमच असावा. नेहमी टी-शर्ट इन केलेला. शांत स्वभाव अन् नम्रतेचा ओढा असलेला अजिंक्य रहाणेने फायनलमध्ये काय चोपलंय!! आधीच पाटा खेळपट्टी, त्यात पावसाची मारा. बॉल स्लो येणार याचा चांगलाच अंदाज रहाणेला आधीच आला असावा, शेवटी कसोटी खेळला माणूस... स्लो बॉलवर फक्त आणि फक्त टायमिंगच्या जोरावर खेळणाऱ्या रहाणेच्या रुपात क्रिकेटप्रेमींना काल अज्जूमध्ये सचिन दिसला असावा, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. दुमट्या हवेत बॉल गरगर सिक्सच्या दिशेने जात असताना अज्जूने पापणी देखील हलवली नसावी, ना कोणता सुटला शॉट, ना कोणत्या बॉलवर झोपला. चालली फक्त टेकनिक. 13 बॉलवर 27 रन्स केल्या आणि चेन्नईचा पारडं जड केलं. 


कौतुकाने हुरळला नाही अन् टीकेने खचला नाही... तो लढत मात्र राहिला. रहाणेने आत्तापर्यंत 3 आयपीएलचे फायनल सामने खेळले. मात्र, एकदाही त्याचा संघ जिंकला नाही, हा मोठा कलंक अजिंक्य रहाणेच्या नावासमोर होता. एकीकाळी ऑरेंज कॅप होल्डर अज्जू.. हळूहळू आयपीएलमधून नजरेआड गेला. पुन्हा सर्वाच्या नजरेत आला तो मुंबई इंडियन्सविरुद्ध. 27 बॉल 61 रन्स... 


आणखी वाचा - कोण म्हणतं Ajinkya Rahane संपला? गोलंदाजांना झोडपत ठोकले 634 रन्स


शरीराचा चुरगळा न करता एकाच जागी उभं राहून मैदान साफ करणं कोणाला जमलं तर ते रहाणेला. बाकी सगळी येड्या बाभळीवरची गबाळी कार्टी. ना खेळात शिस्त, ना टेक्निकचा शहाणपणा. अज्जू मात्र क्रिकेटचे संस्कार दाखवत होता. 2020 नंतर मैदानात थंडावलेला अजिंक्य पुन्हा कडाडलाय. आता डगआऊट तुझी जागा नाही, मैदानात उतर आणि भिड, असा निरोपच धोनीने धाडला होता. मग हा पठ्ठ्या सोडतोय व्हय. रहाणेवर टीकाही झाली. मात्र रहाणे शांत राहिला आणि अखेर आयपीएलचा ट्रॉफी उंचावलीच. शेवटी म्हणावंच लागेल...चित्ते की चाल, बास की नजर आणि रहाणेची टेक्निक...याला कोणतीच तोड नाही भावा..!!