सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर : खेळादरम्यान दुखापत होणं ही सामन्य बाब आहे.पण अनेकदा खेळाडूंना गंभीर दुखापतीमुळे जीवालाही मुकावं लागतं. क्रिकेट विश्वात काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिलिप ह्युजचं (Phillip Hughes) बॅटिंग करताना बॉल मानेवर लागला. यामुळे फिलिपचं निधन झालं होतं. आता आणखी एका क्रिकेटपटूचं सामन्यादरम्यान मृत्यू झालाय. नेमकं काय घडलं, हे आपण या रिपोर्टमधून जाणून घेऊयात. (amateurish cricketer vikram kshirsagar death during match due to hit bolw on private part at pandharpur)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विक्रम गणेश क्षीरसागर असं या मृत्यू झालेल्या क्रिकेटरचं नावं. विक्रम पंढरपूरच्या नेपतगावचा हौशी क्रिकेटपटू. तावशी गावात माणनदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती. त्यावेळी विक्रम क्षीरसागरच्या गुप्तांगाला क्रिकेटच्या बॉलचा जोरात मार लागला. हा मार एवढा जबरदस्त होता की, तो जागीच कोसळला.  मित्रांनी त्याला तातडीनं पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.  मात्र चेंडूचा फटका एवढ्या जोरात बसला होता की, विक्रमचा मृत्यू झाला.



बॉल गुप्तांगावर आदळल्यास काय करावं?


गुप्तांगाच्या ठिकाणी असलेल्या नसांचा मेंदू आणि हृदयाशी संबंध असतो. या नसांना फटका बसला तर हृदयाचे ठोके कमी होतात. रुग्ण अत्यवस्थ होऊन त्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळं असा प्रसंग घडल्यास रुग्णाला खाली झोपवून त्याचे दोन्ही पाय वर करावेत. त्यामुळं चक्कर थांबून त्याला बरं वाटू शकतं. संबंधित व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं, असा सल्ला डॉक्टर देतात.


केवळ क्रिकेटच नव्हे, तर कोणताही खेळ खेळताना गुप्तांगाला मार बसू शकतो. हा मार जीवघेणा देखील ठरू शकतो. दुर्दैवानं भर मैदानात असं काही घडलं तर नेमकं काय करावं, याचं साधं प्रशिक्षण प्रत्येक खेळाडूला द्यायला हवं.