IPL 2020: अमित मिश्राकडे यंदा मलिंगाचा रेकॉर्ड मोडण्याची संधी
यंदा लसिथ मलिंगा आयपीएलमध्ये खेळत नाहीये.
दुबई : भारतात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएल 2020 चे आयोजन यावेळी यूएईमध्ये होत आहे. संयुक्त अरब अमिरात (यूएई) च्या खेळपट्ट्यांमुळे फिरकीपटूंना मदत होईल अशी अपेक्षा आहे, परंतु दिल्ली कॅपिटलचा लेगस्पिनर अमित मिश्रा याचं असं म्हणणं आहे की, आतापर्यंतची परिस्थिती 'तटस्थ' असल्याने अशा प्रकारची भविष्यवाणी करणे फार घाईचे ठरेल.
36 वर्षीय स्पिनर अमित मिश्राला वाटतं की, युएईच्या खेळपट्ट्या फलंदाजांसाठी आहे की गोलंदाजांसाठी हे सामने सुरू झाल्यानंतरच कळू शकतील. "आतापर्यंत परिस्थिती वेगळी आहे, फलंदाजांसाठी किंवा गोलंदाजांसाठी ती किती अनुकूल आहे हे आताच मी सांगू शकत नाही. जेव्हा आम्ही खेळण्यास सुरवात करतो तेव्हाच स्पष्ट चित्र समोर येईल.
दिल्ली कॅपिटलच्या तयारीबाबत अमित मिश्रा म्हणतो की, "आम्ही खूप सकारात्मक आहोत, पण टी-20 क्रिकेटमध्ये विजयाचे आश्वासन देणे अवघड आहे कारण सर्व संघ अतिशय चॅलेंजर्स असून त्यांच्याकडे दर्जेदार खेळाडू आहेत." आमच्या संघात बरेच सामने जिंकवणारे खेळाडूही आहेत आणि आम्ही प्रत्येक संघानुसार स्वत: ला तयार करू. आम्ही कोणत्याही संघाला कमी लेखत नाही आणि प्रत्येकाचेही तितकेच मूल्यांकन करणे आवश्यक आहे.'
मिश्राने आतापर्यंत 147 आयपीएल सामन्यांमध्ये 157 बळी घेतले आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मिश्रा दुसर्या क्रमांकावर आहे आणि वैयक्तिक कारणांमुळे या वेळी या स्पर्धेत भाग घेत नसलेल्या मलिंगा (लसिथ मलिंगा) च्या तुलनेत तो फक्त 13 गडी मागे आहे. अशा परिस्थितीत मिश्राकडे आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट मिळवण्याची उत्तम संधी आहे.
शनिवारी आयपीएल २०२० ची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्या सामन्यापासून होणार असून दिल्ली कॅपिटल आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रविवारी सामना रंगणार आहे.