नवी दिल्ली: तडाखेबंद फलंदाजी, चपळ यष्टीरक्षण आणि संयमी नेतृत्त्वगुणांच्या जोरावर क्रिकेटविश्वात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. क्रिकेट सामन्यांमध्ये चमत्कार घडवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या धोनीने आज आपल्या निवृत्तीची घोषणा करत क्रीडारसिकांना नेहमीप्रमाणे अनपेक्षित धक्का दिला. यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. धोनीचे अनेक चाहते त्याच्या आठवणींना उजाळा देत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीपाठोपाठ सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीदेखील ट्विट करून धोनीविषयीच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, धोनीने भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानासाठी त्याच्या जगभरातील असंख्य चाहत्यांप्रमाणेच मीदेखील त्याला धन्यवाद देऊ इच्छितो. त्याच्या संयमी वृत्तीमुळे अनेक सामने भारताच्या बाजूने झुकले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषकाला गवसणी घातली. आपल्या अनोख्या शैलीने धोनीने नेहमीच सर्वांना मंत्रमुग्ध केले. आगामी काळातही तो भारतीय क्रिकेटविश्वासाठी योगदान देत राहील, अशी आशा मी करतो. माही, जागतिक क्रिकेट हेलिकॉप्टर शॉटची आठवण काढेल, अशी स्तुतीसुमने अमित शाह यांनी उधळली आहेत. 


धोनीने ३५० वनडेमध्ये ५०.५८ च्या सरासरीने १०,७७३ रन केले, यामध्ये १० शतकं आणि ७३ अर्धशतकांचा समावेश आहे. तर ९८ टी-२० मॅचमध्ये धोनीने ३७.६ च्या सरासरीने १,६१७ रन केले. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर २ अर्धशतकं आहेत. २०१४ सालीच धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली होती. ९० टेस्ट मॅचमध्ये धोनीने ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ रन केले. यामध्ये ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं होती.