व्हिडिओ : पर्पल कॅप मिळाल्यानंतर हमसून-हमसून रडला हा क्रिकेटर
त्यानं आपल्या दमदार खेळीनं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं... पर्पल कॅपही मिळवली... पण, त्यानंतर मात्र तो हमसून हमसून रडताना दिसला.
नवी दिल्ली : जोस बटलरची दमदार बॅटींग आणि बॉलर्सच्या जोरदार कामगिरीच्या जोरावर आयपीएल 2018 मध्ये राजस्थाननं पंजाबला 15 रन्सनं पछाडलं. जोस बटलरनं 58 बॉल्समध्ये नऊ चौकार आणि एक षटकार ठोकत 82 रन्स ठोकले. यामुळे राजस्थाननं 8 विकेट गमावत 158 रन्स बनवले. उत्तरादाखल पंजाबच्या टीमला 7 विकेटवर केवळ 143 रन्स बनवता आले. लोकेश राहुल 95 रन्स बनवून नाबाद राहिला... तरीदेखील पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. ही मॅच सुरू होण्यापूर्वी पंजाबच्या एका खेळाडूला वाईट बातमी समजली होती. तरीही त्यानं आपल्या दमदार खेळीनं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं... पर्पल कॅपही मिळवली... पण, त्यानंतर मात्र तो हमसून हमसून रडताना दिसला.
पर्पल कॅपवर ताबा
ऑस्ट्रेलियाचा बॉलर एन्ड्र्यू टायनं शेवटच्या ओव्हरमध्ये आयपीएल 2018 चा सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या बेन स्टोक्स समवेत तीन विकेट घेतल्या. त्यानं चार ओव्हरमध्ये 34 रन्स देऊन चार विकेट घेतल्या... आणि पर्पल कॅपवर ताबा मिळवला. ही मॅच राजस्थाननं जिंकली असली तरी सर्वात जास्त चर्चा झाली ती लोकेश राहुल आणि एन्ड्रुयू टायची...
काय होती वाईट बातमी...
मॅच सुरू होण्यापूर्वीच पंजाबचा बॉलर एन्ड्र्यू टाय याला कुटुंबीयांकडून एक वाईट बातमी समजली होती. त्याच्या आजीचं निधन झाल्याची बातमी समजल्यामुळे त्याला धक्काच बसला होता. त्यामुळे, मॅच सुरू होण्यापूर्वीच
टाय खूप दु:खी होता. तो मैदानावरही काळी पट्टी बांधून उतरला... यावर 'आजी' असं लिहिलेलं होतं.
मॅचनंतर जेव्हा त्याला पर्पल कॅप दिली गेली... तेव्हा मैदानावर त्याला आजीच्या आठवणीनं रडू कोसळलं... आणि तो हमसून हमसून रडू लागला. 'मला याची कल्पनाही नव्हती. माझी आजी आज आम्हाला सोडून गेली. मी ही पर्पल कॅप माझ्या आजीला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला समर्पित करतो. ही मॅच माझ्यासाठी खूपच भावूक होती. हा एक कठिण दिवस होता' असं म्हणत टायनं या मॅचमध्ये घेतलेल्या चार विकेटस आपल्या आजीला समर्पित केल्या.