मुंबई : कोपा अमेरिकेची आज फायनल मॅच रंगली होती. ब्राझिल विरूद्ध अर्जेंटीना या मॅचमध्ये अखेर अर्जेंटीनाने बाजी मारत गतविजेत्या ब्राझीलवर 1-0 ने मात केली आहे. ब्राझीलला फायनल मॅचमध्ये हरवत कोपा अमेरिकेच्या कपवर अर्जेंटीनाने आपलं नावं कोरलं. या विजयासह अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं स्वप्नही पूर्ण झालं आहे. तब्बल 28 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोपा अमेरिकेचा मोठा खिताब अर्जेंटीनाच्या नावे झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जेंटीनच्या विजयात मोलाची भूमिका बजावली ती एंजल डी मारियाने. डी मारियाने 22 व्या मिनिटाला गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. यानंतर ब्राझीलनेही अटॅक करत चांगला खेळ केला. मात्र अर्जेंटीनाच्या डिफेंडर्ससमोर त्यांचा निभाव लागला नाही. सेंकड हाफमध्येही ब्राझीलला एकाही गोलची कमाई करता आली नाही. अखेर 90 मिनिटांच्या खेळानंतर अर्जेंटीनाने 1-0ने ब्राझीलवर मात करत कोपा अमेरिका चॅम्पियन्स बनले आहेत.


दरम्यान यंदाच्या कोपा अमेरिकेमध्ये अर्जेंटीना खेळ पहिल्यापासूनच चांगला राहिला होता. या स्पर्धेत अर्जेंटीना संघ एकदाही पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. सेमीफायनलमध्येही कोलंबिया विरोधात 90 मिनिटांमघ्ये 1-1 असा सामना सुटल्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 अशा फरकाने फायनमध्ये धडक मारली होती. तर आज फायनल जिंकून कोपा अमेरिकेच्या यंदाच्या कपवर शिक्कामोर्तब केलं.


दुसरीकडे अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीसाठी हा विजय फार खास ठरणारा आहे. मेस्सीच्या कॅप्टन्सीअंतर्गत अर्जेंटीनाने 2015 आणि 2016 मध्ये कोपा अमेरिकेच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र या दोन्ही वेळेस अर्जेंटीनाला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 2016 चा पराभव मेस्सीच्या फार जिव्हारीही लागला होता. यानंतर मेस्सीने आंततराष्ट्रीय खेळातून निवृत्त होण्याचाही निर्णय घेतला होता. मात्र आजच्या विजयाने मेस्सीच्या करियरमधला हा मोठा खिताब मानला जातो.