अर्जुन तेंडुलकरचा लिलाव, या टीमकडून खेळणार टी-२० लीग
अर्जुन तेंडुलकरचा लिलाव, मिळाले तब्बल एवढे रुपये
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा टी-२० मुंबई लीगमध्ये लिलाव झाला आहे. अर्जुन तेंडुलकरवर ५ लाख रुपयांची बोली लावून आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब टीमने विकत घेतलं आहे. टी-२० मुंबई लीगच्या दुसऱ्या मोसमासाठीचा लिलाव पार पडला. या लिलावात अर्जुन तेंडुलकरला डावखुरा फास्ट बॉलर आणि बॅट्समन म्हणून सामील करण्यात आलं होतं.
अर्जुन तेंडुलकर मागच्या वर्षी श्रीलंकेमध्ये अंडर-१९ अनधिकृत टेस्टमध्ये भारताकडून खेळला होता. ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत अर्जुन तेंडुलकरची बेस प्राईज एक लाख रुपये एवढे होती. अर्जुन तेंडुलकरवर अनेकवेळा बोली लागली, पण शेवटी नॉर्थ मुंबई पँथर्सनी ५ लाख रुपयांची बोली लावली. दुसरीकडे आकाश टायगर्सने बोली कायम ठेवली. या लिलावातली ही सर्वाधिक रक्कम होती.
समितीने दोन कार्ड एका बॅगेमध्ये टाकली आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य उन्मेश खानविलकर यांनी यातलं एक कार्ड उचललं. या कार्डवर आकाश टायगर्सचं नाव होतं.
दरम्यान लिलावाआधी सूर्यकुमार यादव आणि आकाश परकारला ट्रियम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ इस्टने, शिवम दुबे आणि सिद्धेश लाडला शिवाजी पार्क लायन्सनी, पृथ्वी शॉला नॉर्थ मुंबई पँथर्सनी, जय बिस्टा आणि धुर्मिल मत्करला सोबो सुपरसोनिक्सने, शुभम रांजणे आणि तुषार देशपांडेला आर्क्स अंधेरीने, श्रेयस अय्यर, एकांत केरकरला नमो बांद्रा ब्लास्टर्सने रिटेन केलं.
यासोबतच आदित्य तरे आणि सरफराज खानला इगल ठाणे स्ट्रायकर्स, धवल कुलकर्णी आणि शम्स मुलानीला आकाश टायगर्सने विकत घेतलं. या दोन टीम ८ टीमच्या या स्पर्धेतल्या नव्या टीम आहेत. टी-२० मुंबई लीग १४ मेपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल.