मुंबई : भारताचा फास्ट बॉलर आशिष नेहरानं निवृत्ती जाहीर केल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली आहे. १ नोव्हेंबर २०१७ला शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळेल. न्यूझीलंडविरुद्धची पहिली टी20 दिल्लीच्या फिरोज शहा कोटला मैदानात होणार आहे. नेहरानं त्याच्या क्रिकेटची सुरुवात फिरोज शहा कोटला मैदानातूनच सुरु केली होती आणि आता याच मैदानात नेहरा शेवटची मॅच खेळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवृत्तीबाबत नेहरानं कॅप्टन विराट कोहली आणि कोच रवी शास्त्रीला माहिती दिल्याचंही बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे. पुढचा टी-20 वर्ल्ड कप २०१८ साली होणार आहे. या वर्ल्ड कपआधी नव्या खेळाडूंना योग्य संधी मिळावी म्हणून नेहरानं हा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमातही नेहरा खेळणार नसल्याची माहिती आहे.


नेहरा १७ टेस्ट, १२० वनडे आणि २६ टी 20 मॅच खेळला आहे. नेहरानं ४४ टेस्ट विकेट, १५७ वनडे विकेट आणि ३४ टी 20 विकेट घेतल्या आहेत. २००३ वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध नेहरानं केलेली भेदक बॉलिंग क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहील. २०११ साली भारतानं जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्ड कप टीममध्येही नेहराचा समावेश होता.


इतक्या वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेहरा सात कर्णधारांबरोबर खेळला आहे. १९९९ साली मोहम्मद अजहरुद्दीन कॅप्टन असताना नेहरा पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळला.


आशिष नेहरा सध्याचा भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीबरोबर खेळला आहे. याचबरोबर तो धोनी, द्रविड, गंभीर, गांगुली, सेहवाग आणि अजहरच्या कर्णधारपदाखालीही नेहरा खेळला आहे.


आशिष नेहरानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त मॅच सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाखाली खेळल्या आहेत. गांगुली कर्णधार असताना नेहरा ७७ टेस्ट आणि वनडे मॅच खेळला, यामध्ये त्याला ११५ विकेट मिळाल्या. यामध्ये २००३च्या वर्ल्ड कपमधली इंग्लंडविरुद्धची मॅचही समाविष्ट आहे. या मॅचमध्ये नेहरानं २३ रन्स देऊन ६ विकेट घेतल्या होत्या. गांगुलीनंतर नेहरा धोनीच्या कर्णधारपदाखाली सर्वात जास्त खेळला. धोनीच्या कर्णधारपदाखाली खेळताना नेहरानं ६४ मॅच खेळून ८७ विकेट घेतल्या.