आशिष नेहराच्या निवृत्तीनंतर छोटा नेहरा बॉलिंगसाठी सज्ज
टीम इंडियाचा फास्टर बॉलर आशिष नेहरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा फास्टर बॉलर आशिष नेहरा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
आशिष नेहराच्या चाहत्यांना त्याची कमी नक्कीच जाणवेल. इतकेच नाही तर, टीम इंडियाच्या सदस्यांनी नेहराच्या निवृत्तीनंतर दिलेल्या मेसेजमधूनही स्पष्ट होतं की त्यांनाही नेहराची कमी जाणवेल.
आशिष नेहराने आपल्या स्वभाव आणि खेळाच्या जोरावर क्रिकेट विश्वात १८ वर्ष प्रेक्षकांच्या मनात पोहोचला. आपल्या हसऱ्या चेहऱ्याने मोठ-मोठ्या प्लेअर्सला आपला चाहतं बनवलं. मात्र, आता हाच नेहरा क्रिकेटच्या मैदानात दिसणार नाहीये.
आशिष नेहराने क्रिकेटला अलविदा सांगितल्यानंतर नाराज झालेल्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी आहे. होय... कारण, आशिष नेहराचा मुलगा त्याच्याप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. मात्र, तो अद्याप वयाने खूप लहान आहे. पण, त्याचा अॅटीट्यूड पाहून तो लवकरच क्रिकेट विश्वात आपला खेळ दाखविण्यासाठी सज्ज असल्याचा इशारा दिला आहे.
बुधवारी आशिष नेहराने न्यूझीलंड विरूद्ध दिल्लीमध्ये शेवटची टी-२० मॅच खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावेळी त्याचं संपूर्ण कुटुंब मैदानात उपस्थित होतं. न्यूझीलंड विरोधात विजय मिळवल्यानंतर नेहराचं कुटुंब मैदानात आलं. यावेळी नेहरासोबत त्याची आई, पत्नी आणि दोन्ही मुलं आरुष, अरियाना उपस्थित होते.
यावेळी सर्व प्रेक्षकांच्या नजरा आशिष नेहराचा मुलगा आरुष याच्यावर होत्या. खास बाब म्हणजे नेहराच्या मुलाने यावेळी आपली बॉलिंगची झलक दाखवताना दिसला. आरुषने टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीसमोर आपली बॉलिंग स्किल दाखवली.
विराट कोहलीचे आशिष नेहरासोबत चांगले पारिवारीक संबंध आहेत. यावेळी विराट कोहली हा नेहराच्या मुलांसोबत मस्ती करण्याच्या मुडमध्ये पहायला मिळाला.