चेन्नई : भारताचे युवा स्पिनर युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनी वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केलं. या दोन क्रिकेटपटूंमुळे अश्विन आणि जडेजाला वनडे आणि टी-२० टीममधलं स्थान गमवावं लागलं आहे. आता वनडे क्रिकेटमध्ये अश्विनचं पुनरागमन होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. खुद्द अश्विननंच यावर प्रतिक्रिया दिली आहे. मला निळी जर्सी घालून वर्ल्ड कप खेळायचा आहे, पण हे माझ्या हातात नाही. कारकिर्दीच्या या टप्प्यावर मी खेळाची मजा घेऊ इच्छितो. जर मला संधी मिळाली तर मी सकारात्मक विचार कायम ठेवीन, असं अश्विन म्हणाला. टीममध्ये निवड होईल की नाही हे निवड समितीवर अवलंबून आहे. टीममध्ये निवड होणं माझ्या हातात नसल्याचं वक्तव्य अश्विननं केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये अश्विन पंजाबच्या टीमचा कर्णधार होता. पण या मोसमात अश्विनची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. पंजाबलाही आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये क्वालिफाय होता आलं नाही. तामीळनाडू प्रिमिअर लीगमध्ये अश्विन डिंडीगूल ड्रॅगन्सकडून खेळला.


आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या टी-२० आणि वनडे टीममध्ये अश्विन आणि रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलेली नाही. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांचं भारतीय टीममधलं स्थान आता जवळपास निश्चित आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये या दोघांनी कमाल केली होती. आयर्लंडविरुद्धच्या टी-२०मध्येही कुलदीप आणि चहल भारताच्या विजयाचे हिरो ठरले. या मॅचमध्ये कुलदीपनं २१ रन देऊन ४ विकेट घेतल्या. तर चहलला ३८ रन देऊन ३ विकेट घेण्यात यश आलं.


कुलदीप आणि चहलच्या बॉलिंगपुढे लोटांगण घातलेल्या आयर्लंडच्या टीमला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १३२ रनच बनवण्यात आल्या. या मॅचमध्ये आयर्लंडनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारताचे ओपनर रोहित शर्मा आणि शिखर धवननं अर्धशतकी खेळी केली. दोन टी-२० च्या या सीरिजमध्ये भारत १-०नं आघाडीवर आहे.