Asia Cup 2022: एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) आता सुपर 4 चा थरार सुरु होईल. चार अव्वल टीम एकमेकांना भिडतील. त्यानंतर ठरेल एशियाची चॅम्पियन टीम. पण त्याआधी क्रिकेट प्रेमींसाठी एक मोठी बातमी. पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) कर्णधार आणि सलामीचा फलंदाज बाबर आझमला टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवपासून धोका निर्माण झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (T20I Batting Rankings) बाबर आझमने (Babar Azam) आपलं अव्वल स्थान अबाधित ठेवलं आहे. पण आता त्याचं हे स्थान धोक्यात आलं आहे. याला कारण आहे टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्यकुमार यादव सध्या चांगलाच फॉर्मात असून एशिया कप स्पर्धेतच सूर्यकुमार बाबर आझमचा नंबर वनचं स्थान हिसकावून घेऊ शकतो.


टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारी
बाबर आझम सध्या 818 गुणांसह टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर पाकिस्तानचाच मोहम्मद रिझवान 796 अंकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्यापाठोपाठ म्हणजे तिसऱ्या स्थानावर 792 अंकासह भारताचा सूर्यसुमार यादवचा नंबर आहे. म्हणजेच बाबर आणि सूर्यामध्ये केवळ 24 गुणांचं अंतर आहे. एशिया कप स्पर्धेत सूर्यकुमार यादवची बॅट चालली तर याच स्पर्धेत सूर्यकुमार बाबर आझमला मागे टाकू शकतो.


सूर्यकुमारला विक्रमाची संधी
एशिया कप स्पर्धेच्या सुपर-4 टप्प्यात भारतीय संघ तीन सामने खेळणार आहे. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला तर सूर्यकुमारला चौथा सामना खेळण्याचीही संधी मिळू शकते. म्हणजेच चार सामन्यात सूर्यकुमार यादवने मोटी खेळी केली तर तो टी-20 क्रिकेटमधला नंबर वन खेळाडू बनू शकतो. पण त्याचबरोबर बाबर आझम आणि रिझवानच्या खेळीवरही त्याला लक्ष ठेवावं लागेल.


सूर्यकुमारची टी-20 मधली कामगिरी
मार्च 2021 मध्ये सूर्यकुमारने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत सूर्यकुमार भारतासाठी 25 टी20 सामने खेळला आहे. यात त्याने एक शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदीतने 758 धावा केल्या आहेत. एशिया कप स्पर्धेत सूर्याने 26 चेंडूत 68 धावांची तुफान खेळी केली होती.