Asia Cup 2022: अर्धशतक झळकवल्यानंतर विराट कोहलीची वेगळ्याच कारणासाठी चर्चा, पाँटिंग म्हणाला `माझी इच्छा आहे की..`
पाकिस्तान आणि हाँगकाँगला पराभूत करत भारताने सुपर 4 फेरीत स्थान निश्चित केलं आहे. असं असलं तरी सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या कामगिरीकडे लागून आहेत.
Asia Cup 2022 Viral Kohli In Form: आशिया कप स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. पाकिस्तान आणि हाँगकाँगला पराभूत केल्यानंतर सुपर 4 फेरीत स्थान निश्चित केलं आहे. असं असलं तरी सर्वांच्या नजरा विराट कोहलीच्या कामगिरीकडे लागून आहेत. कारण गेल्या काही वर्षात विराट कोहलीच्या बॅटमधून हव्या तशा धावा आलेल्या नाहीत. त्यामुळे त्याच्यावर चहुबाजूने टीका होत आहे. हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक झळकावलं खरं पण टी 20 सारख्या फॉर्मेटमध्ये इतक्या धीम्या गतीने केलेली खेळी टीकेची धनी ठरली आहे.
विराट कोहलीने 44 चेंडूत नाबाद 59 धावा केल्या. या खेळीत 3 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. त्याचबरोबर या सामन्यात जवळपास 6 वर्षांनी विराट कोहलीने गोलंदाजी केल्याने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीला गोलंदाजी करण्यास सांगितलं. संघाचं 17 वं षटक विराट कोहलीला सोपण्यात आलं. या षटकात विराटने 6 धावा दिल्या. मात्र गडी बाद करण्यात अपयश आलं. यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिक्रिया दिल्या.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पाँटिंग यानेही विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. 'त्याने फॉर्ममध्ये परत येण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मला आशा आहे की, आम्ही त्याला विश्वचषकात सर्वोत्तम कामगिरी करताना पाहू. विराटने इथल्या (ऑस्ट्रेलियात) मैदानावर धावा करून या स्पर्धेतील आघाडीच्या खेळाडूंपैकी एक व्हावे अशी माझी इच्छा आहे."