Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. तर 28 ऑगस्टला हायव्होल्टेज भारत पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूच्या फॉर्मबाबत चर्चा रंगली आहे. अशात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला मागच्या काही सामन्यात सूर गवसलेला नाही. नोव्हेंबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलं नाही. कोहली बर्‍याच दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. आता विराट कोहलीने आपल्या फलंदाजीबाबत मत व्यक्त केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करू शकलो नाही अशी कबुली विराट कोहलीनं दिलं आहे. तेव्हा चुकीच्या शॉट्स निवडीमुळे फटका बसल्याचं त्याने सांगितलं आहे. तर आता शॉट निवडीवर काम केले असून अनेक सुधारणा केल्याचं सांगितलं आहे. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यात शेवटचा सामना खेळल्यानंतर कोहलीने जवळपास महिनाभर क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. आता आशिया कप टी-20 स्पर्धेतून भारतीय संघात पुनरागमन करत आहे.


आशिया कप स्पर्धेत 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले तर हा कोहलीचा 100 वा आंतरराष्ट्रीय T20 सामना असेल. स्टार स्पोर्ट्सवरील 'गेम प्लॅन' शोमध्ये कोहलीने सांगितलं की, 'इंग्लंडमध्ये जे घडले ती वेगळी गोष्ट होती, मी माझ्या शॉटच्या निवडीत सुधारणा केली आहे. आता मला फलंदाजीत कोणतीही अडचण दिसत नाही." दीर्घकाळ खराब फॉर्ममध्ये राहण्याच्या या टप्प्याचे महत्त्व सांगताना म्हणाला की, यामुळे खेळाकडे तसेच जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सुधारला आहे.


विराट कोहली याने पुढे सांगितलं की, 'मी काय करत आहे हे मला माहीत आहे आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एवढ्या पुढे जाऊ शकत नाही. जेव्हा तुमच्याकडे परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोलंदाजीचा सामना करण्याची क्षमता नसते.' 


"जोपर्यंत मी चांगली कामगिरी करू इच्छितो तोपर्यंत मला माहित आहे की चढ-उतार असतील आणि जेव्हा मी या टप्प्यातून बाहेर पडेन तेव्हा मला माहित आहे की मी किती सातत्य राखू शकतो. माझे अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत.", असंही विराट कोहलीने पुढे सांगितलं.