Asia Cup 2022 : एशिया चॅम्पियन ठरली श्रीलंका, पाकिस्तानवर 23 धावांनी विजय
आशिया कपच्या फायनलमध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानचा केला पराभव
दुबई : आशिया कपच्या प्रमुख दावेदार पाकिस्तान संघाचा पराभव करत श्रीलंकेने आपल्या नावावर केला आहे. या विजयासह श्रीलंकेने सहाव्यांदा आशिया कपावर नाव कोरलं आहे. तर पाकिस्तान संघ तिसऱ्यांदा आशिया कपावर नाव कोरण्यापासून हुकला आहे. श्रीलंकेच्या विजयाचा शिल्पकार भानुका रजपक्षा ठरला आहे. 23 धावांनी श्रीलंकेने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 147 धावांवर गुंडाळला. श्रीलंकेकडून प्रमोद मधूशनने 4 विकेट्स, वानिंदू हसरंगाने 3 तर करूणारत्नेने 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानतर्फे मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीलाच श्रीलंका संघाला धक्के दिले. नसीम शहाने श्रीलंकेच्या कुसल मेंडिसला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर आलेल्या निसांकाला 8 धावा आणि गुणतिलका 1 धावेवर हॅरीस रॉफने बाद करत दोन धक्के दिले. कर्णधार शनाकालाही शादाबने 2 धावांवर माघारी पाठवलं.
श्रीलंकेने 58 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी भानुका राजपक्षेने मोर्चा आपल्या हाती घेत जबरदस्त बॅटींग करत 45 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यासोबतच वानिंदू हसरंगानेही 21 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानला 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
पाकिस्तान संघ फलंदाजीला आल्यावर फॉर्ममध्ये नसलेला कर्णधार बाबर आझम 5 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या फखर जमान शून्यावर बाद करत प्रमोद मधूशनने दोन धक्के दिले. त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि अहमद यांची जोडी जमली असं वाटत असताना पुन्हा एकदा प्रमोद मधूशनने अहमदला 32 धावांवर आपल्याच गोलंदाजीवर कॅच पकडत तंबूचा मार्ग दाखवला.
पाकिस्तानवर पुर्णपणे दबाव आला होता, एकीकडे गडी बाद होत होते तर दुसरीकडे रिक्वाईड रन रेट वाढत होता. मोहम्मद रिझवानने एक बाजू लावून धरली होती. मात्र हसरंगाने रिझवानला 55 धावांवर बाद करत आणखी एक धक्का दिला. मात्र त्यानंतर पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे पाकिस्तान संघाच्या विकेट्स गेल्या. पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ऑल आऊट झाला.